भाऊसाहेब भोईर, नढे निलंबित
By Admin | Published: February 14, 2015 03:02 AM2015-02-14T03:02:25+5:302015-02-14T03:02:25+5:30
पक्षशिस्तीचा भंग आणि पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत महापालिकेचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर व विनोद नढे यांना शुक्रवारी
पिंपरी : पक्षशिस्तीचा भंग आणि पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत महापालिकेचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर व विनोद नढे यांना शुक्रवारी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने पक्षातून निलंबीत केले. प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली. भोईर हे शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, तर नढे महापालिकेतील विरोधी पक्षनेते आहेत.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासून शहर काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली. त्याचे पडसाद पक्ष संघटनेवर उमटले होते. महापालिका गटनेता म्हणून कैलास कदम यांची निवड पक्षश्रेष्ठींनी केली. मात्र, ते विरोधी पक्षनेते पदासाठी दावा करतील, म्हणून त्यांच्या निवडीलाच नढे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. तसेच कदम व प्रभारी शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या कारभाराविषयी पक्षश्रेष्ठींकडे वारंवार तक्रारींना सुरूवात केली.
यामध्ये नढे व भोईर यांच्यासह राहुल भोसले, गणेश लोंढे, आरती चौंधे, गीता मंचरकर, सविता आसवानी, विमल काळे, शकुंतला बनसोडे आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या साऱ्यांनी शहर काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष साठे हे जुन्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. त्यांच्याबरोबर काम करणे कठीण झाले आहे. ते अध्यक्ष आहेत, तोपर्यंत पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. यातूनच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाऊ लागल्या. ही परिस्थिती पक्षहिताला बाधा ठरणारी असल्याने पक्षश्रेष्ठींनी कारवाईचा निर्णय घेतला, अशी चर्चा आहे. (प्रतिनिधी)