भाऊसाहेब रंगारी, लोकमान्य टिळकांमुळे पुण्याचा गणेशोत्सव जगभर लोकप्रिय - रवींद्र धंगेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 02:04 PM2023-08-23T14:04:16+5:302023-08-23T14:04:34+5:30
पोलीस प्रशासन आणि गणेशभक्त एकत्र येऊन यावर्षीचा सोहळा आणखी दिमाखदार होईल यासाठी काम करू
पुणे : ‘हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केला. लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाचा प्रसार केला आणि पुढे पुण्याचा गणेशोत्सव संपूर्ण जगभर लोकप्रिय झाला,’ असे प्रतिपादन आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणेशोत्सवाचा वासापूजन सोहळा सोमवारी पार पडला. या समारंभाला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, आमदार रवींद्र धंगेकर, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, अप्पर पोलिस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, आदी उपस्थित होते. वासापूजन सोहळ्याने मंडप उभारण्याच्या कामाला सुरुवात होते. या सर्व मान्यवरांनी मंडपाचे वासापूजन आणि श्रीफळ वाढवून उत्सवाचा प्रारंभ केला.
यावेळी आमदार धंगेकर म्हणाले, पोलीस प्रशासन आणि गणेशभक्त एकत्र येऊन यावर्षीचा सोहळा आणखी दिमाखदार होईल यासाठी काम करू. तर सह पोलिस आयुक्त कर्णिक म्हणाले, गणेशोत्सवाला सर्वांचे सहकार्य लाभते. पोलिस विभागाकडूनही सर्व तयारीला सुरुवात झाली आहे. यावर्षीचा उत्सव आणखी जोमाने साजरा होईल. गणेश भक्तांच्या सुरक्षितेसाठी पोलिस प्रशासन २४ तास काम करेल. उत्सव भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा व्हावा हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. उत्सवप्रमुख बालन यांनी दरवर्षीप्रमाणे धार्मिक पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होईल असे सांगत, दहा दिवसांतील उपक्रमांची माहिती दिली.