भीमा नदीचा बंधारा कोरडा
By admin | Published: April 20, 2016 12:45 AM2016-04-20T00:45:50+5:302016-04-20T00:45:50+5:30
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेलपिंपळगाव परिसरातील भीमा नदीचा बंधारा कोरडा पडला असून, दोन दिवस पुरेल इतकाच निचांकी साठा शिल्लक आहे
शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेलपिंपळगाव परिसरातील भीमा नदीचा बंधारा कोरडा पडला असून, दोन दिवस पुरेल इतकाच निचांकी साठा शिल्लक आहे. परिणामी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा; तसेच शेतीसिंचनाचा प्रश्न शेतकरीवर्गासमोर उभा राहिला आहे. चासकमान कालवा झाल्यापासून प्रथमच हा बंधारा कोरडा पडण्याच्या मार्गावर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे चासकमान धरणातून कालव्याद्वारे आवर्तन देऊन हा बंधारा काही अंशी भरून द्यावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहे.
चासकमान डाव्या कालव्याच्या मागील आवर्तनाद्वारे पोटचाऱ्यामार्फत सोडण्यात आलेले पाणी काहीशा प्रमाणात या बंधाऱ्यात आले होते. मात्र, बंधारा पूर्ण क्षमतेने न भरल्यामुळे आवर्तन बंद झाल्यानंतर अगदी काही दिवसांतच परिसरात पाण्याचा ठणठणाट झाला. या बंधाऱ्याच्या पाण्यावर परिसरातील शेतकऱ्यांचे विद्युत पंप अवलंबून असून, पाणी संपल्याने ते बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. खेडच्या पूर्व भागातील बहुतांशी गावे चासकमान डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. चासकमानच्या डाव्या कालव्याला आवर्तन मिळाल्यानंतर परिसरातील पोटचाऱ्यामार्फत ते विविध ठिकाणच्या पाणीस्रोतांना वितरित केले जाते. परंतु, या हंगामात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने पोटपाट कोरडे ठणठणीत पडले आहेत.
परिणामी परिसरातील विहिरी, तलाव, नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांचे पाणी पातळी निच्चाकी पातळीवर आली आहे.