भिडे गुरुजी यांच्याा समर्थनार्थ मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 09:10 PM2018-03-27T21:10:22+5:302018-03-27T21:10:22+5:30
लालमहालापासून सकाळी साडेदहा वाजता मोर्चा निघून तो जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार होता़.त्यासाठी संयोजकांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती़ .
पुणे : श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ बुधवारी पुण्यात काढण्यात येणाऱ्या मोर्चाला कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरुन पोलिसांनी परवानगी नाकारली आहे़.कोरेगाव भीमा येथील दंगलीप्रकरणी समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना अटक केल्यानंतरही श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांना अटक करण्यात येत नाही़. त्यांना अटक करावी, या मागणीसाठी भारीप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मुंबई मोर्चा काढण्यात आला़ होता़.त्याला विरोध करण्यासाठी आणि संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ पुणे शहरातून बुधवारी मोर्चा काढण्यात येणार होता़. मोर्चात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणार होते़. लालमहालापासून सकाळी साडेदहा वाजता मोर्चा निघून तो जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार होता़.त्यासाठी संयोजकांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती़ .पुणे पोलीस दलाच्या दक्षिण प्रादेशिक विभागाने मंगळवारी सायंकाळी या मोर्चाला परवानगी नाकारली़. याबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी सांगितले की, शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे़ तशी संयोजकांशी चर्चा करण्यात आली आहे़.मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर काही प्रमुख कार्यकर्ते शनिवारवाड्याच्या प्रांगणात जमणार आहेत़. त्यानंतर संयोजक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले जात आहे़.
दरम्यान, संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चाला परवानगी देऊ नये अशी मागणी करणारे निवेदन संभाजी ब्रिगेडतर्फे पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी जरी संभाजी भिडेंबाबत कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले असले तरी संभाजी भिडे हेच कोरेगाव-भीमा दंगलीचे खरे सुत्रधार असून त्यांच्या कार्यकत्यांनी बैठका घेऊन सामाजिक तेढ निर्माण करणारी पत्रके वाटली असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.