भिडे गुरुजींच्या भक्ती-शक्ती संगमावर पोलिसांचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 10:30 PM2018-07-06T22:30:47+5:302018-07-06T22:42:05+5:30
यंदा पालखी सोहळ्यात साध्या वेशातील पोलिसांचे पथक सहभागी होणार असून श्री शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
पुणे : श्री शिवप्रतिष्ठानच्यावतीने यावर्षी देखील वारकरी-धारकरी संगमाचे नियोजन करण्यात आले असून संभाजी भिडे गुरूजी आपल्या कार्यकर्त्यांसह त्यात सहभागी होणार आहेत. यापार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यात तीक्ष्ण शस्त्रे घेऊन सहभागी होऊ नये, अशी नोटीस पुणे पोलिसांकडून श्री शिव प्रतिष्ठानला बजावण्यात आली आहे. तर धारक-यांनी कोणतेही शस्त्र घेऊन सहभागी होऊ नये, आवाहन प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.
कार्यकर्त्यांनी शस्त्र न बाळगणे, वारक-यांना त्रास होईल, असे वर्तन न करण्यासारख्या विविध अटी घालत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. गेल्या वर्षी पालखी सोहळ्यात श्री शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते तलवारी घेऊन सहभागी झाले होते. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज (७ जुलै) शहरात आगमन होणार आहे. संघटनेच्या नियोजनानूसार जंगली महाराज मंदिरात दुपारी दोन वाजल्यापासून धारकरी जमा होणार आहेत. यानंतर चार वाजता भिडे गुरुजी तेथे येऊन धारक-यांना मार्गदर्शन करुन संचेती चौकात पालखीच्या स्वागतासाठी जातील. तेथे प्रथम तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यावर पालखीचे दर्शन घेतील. त्यानंतर श्री ज्ञानेश्वर महारांच्या पालखीचे दर्शन घेतले जाईल. पालखीच्या पुढे धारकरी सहभागी होणार नाहीत. मात्र, श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाल्यावर त्यामागे धारकरी डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत चालत जाणार आहे.
धारकरी कोणत्याही प्रकारचे शस्त्र सोबत आणणार नाहीत तसेच वारक-यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आणि अर्वाच्च घोषणा द्यायच्या नाही, असे आवाहन प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संजय जढर यांना नोटीस पाठविली आहे. संघटनेच्या लोकांनी पालखीची वर्षानुवर्षांची परंपरा मोडत १८ जून २०१७ रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी थांबविली होती. संघटनेचा हा प्रकार तीन वर्षांपासून सुरू असून त्यांना प्रतिबंध करण्याचे पत्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने पोलिसांना दिल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. यापार्श्वभूमीवर यंदा पालखी सोहळ्यात साध्या वेशातील पोलिसांचे पथक सहभागी होणार असून श्री शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.