'भीमसैनिक खवळला तर शांत राहणार नाही, चंद्रकांत पाटलांना भविष्यात...' अमोल मिटकरींनी केली भीती व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 03:55 PM2022-12-11T15:55:34+5:302022-12-11T15:55:43+5:30
एकदा बोलता व नंतर माफी मागता, याचा अर्थ तुम्ही जाणीवपूर्वक बोलता.
दौंड : चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी देणगी मागून म्हणजेच भीक मागून शाळा चालवल्याचे वादग्रस्त विधान केले होते. तर भाजप मधील नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहेत. असे असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. याचा
राग मनात धरून काही कार्यकर्त्यांनी चिंचवड येथे सहा वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली. पोलिसांनी शाई फेकणाऱ्या मनोज गरबडेसह तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर विरोधी पक्षातूनही या प्रकरणाबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्याबाबत भीती व्यक्त केली आहे. या प्रकरणात भीमसैनिक खवळला तर शांत राहणार नाही, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना भविष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागेल असं ते यावेळी म्हणाले आहेत.
मिटकरी म्हणाले, उच्च शिक्षण खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेली शाईफेक किंवा ती प्रतिक्रिया लोकशाहीला धरून नाही. एकदा बोलता व नंतर माफी मागता, याचा अर्थ तुम्ही जाणीवपूर्वक बोलता. तुम्हा एवढी तरी अक्कल असावी की आपण कॅबिनेट मंत्री आहोत. महापुरूषांविषयी असे कसे बोलू शकतात ?. पण या प्रकरणात भीमसैनिक खवळला तर शांत राहणार नाही, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना भविष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागण्याची भीती अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली.
लवकरच हा राजकीय भूकंप होणार
सध्याच्या परिस्थितीत शिंदेगट आणि भाजप या दोन्ही गटातील काही आमदारांत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. शिंदे गटातील काही आमदारांना विश्वास आहे की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडून येऊ शकतो, त्यानुसार शिंदे गटाचे तीन आमदार येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले असतील . त्या पाठोपाठ भाजपचे काही आमदार या दोन्ही गटातील आमदारांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली असून लवकरच हा राजकीय भूकंप होणार असल्याचे मिटकरी यांनी स्पष्ट केले.
''राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या काही वाचाळविरांनी राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याचा सपाटा लावला आहे, तेव्हा महाराष्ट्रात वाचाळविचारांविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. परिणामी, खुद्द भाजप आणि शिंदे गटाच्या काही मंत्री आणि आमदारांनीदेखील राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्या वाचाळांबाबत संताप व्यक्त केलेला आहे. कर्नाटक सरकार मराठी माणसांवर अन्याय करीत आहे. मात्र, शिंदे आणि फडणवीस सरकार या प्रश्नावर गप्प आहे, ही महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.''
राज्यपालांनी वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत
राज्यपाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील आहे. परिणामी, राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राज्यपालांपुढे नमते घ्यावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. मुळातच राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून काम करण्याची इच्छा नाही. दरम्यान, काहीतरी वादग्रस्त विधान केले तर आपली महाराष्ट्रातून हकालपट्टी होईल, म्हणून राज्यपालांनी वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य करीत असल्याचे शेवटी मिटकरी म्हणाले.