भीमा स्वच्छ, सुंदर करण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 03:00 AM2017-08-08T03:00:40+5:302017-08-08T03:00:44+5:30
भीमा नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी राज, समाज व प्रशासन हे तिघे एकत्र आले पाहिजेत, भीमा स्वच्छ झाली तर जंगल, लोक, धरती, प्रदेश व देशाचे भले होईल. यासाठी भीमाशंकरमधील झाडांची रक्षा करण्याचा संकल्प आपण रक्षाबंधनाच्या दिवशी करू, असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी भीमाशंकर येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भीमाशंकर : भीमा नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी राज, समाज व प्रशासन हे तिघे एकत्र आले पाहिजेत, भीमा स्वच्छ झाली तर जंगल, लोक, धरती, प्रदेश व देशाचे भले होईल. यासाठी भीमाशंकरमधील झाडांची रक्षा करण्याचा संकल्प आपण रक्षाबंधनाच्या दिवशी करू, असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी भीमाशंकर येथे केले.
भीमा नदीचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथून नमामी चंद्रभागा यात्रेला डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते सुरुवात झाली. नदी ही राष्टीय संपत्ती असून तिच्या प्रदूषणामुळे दुष्काळ व पूर या घटना घडू लागल्या आहेत. पूर व दुष्काळमुक्त आणि समृद्ध भारत करण्यासाठी सामान्य माणसांना, विशेषत: पुढच्या पिढीला नदीशी जोडण्याच्या अनुषंगाने जल बिरादरीने काश्मीर ते कन्याकुमारी या कार्यक्षेत्रात १०१ ठिकाणी नदी संवाद जल साक्षरता यात्रा आयोजित केली होती.
या वेळी जलतज्ज्ञ अनिल पाटील, पंचायत समिती सदस्य अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, सरपंच दीपक चिमटे, ग्राम परिस्थितिकी विकास समितीचे अध्यक्ष मारुती लोहकरे, सहायक उपवनसंरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे, तहलीसदार सुनील जोशी आदी उपस्थित होते. या वेळी ‘नमामी चंद्रभागा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
नमामी चंद्रभागा मोहिमेत भीमेच्या कडेला राहणाºया लोकांनी ही नदी स्वच्छ करण्याचे ठरविले पाहिजे. जमिनी, डोंगरांना हिरवेगार बनविण्यासाठी नदीची पवित्रता टिकली पाहिजे, यासाठी सर्वांनी संकल्प करा. प्रथम भीमा नदीचा उगम असलेले भीमाशंकर गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा निश्चय या वेळी करा, असे आवाहन त्यांनी केले.
१०१ यात्रांचे समायोजन
भीमा नदीचा संगम असलेल्या विजापूर येथे देशभरातून निघालेल्या १०१ यात्रांचे समायोजन होणार आहे.
या यात्रेत चंद्रभागा म्हणजेच भीमा नदीचे पाणी समाविष्ट होणार असून, या नमामी चंद्रभागा यात्रेची सुरुवात आज (दि. ७) भीमाशंकर येथून झाली. ही यात्रा भीमेच्या उगमापासून संगमापर्यंत जाणार आहे.
पुढच्या पिढीला सुखी करण्यासाठी ही जंगले, जंगलातील प्राणी वाचणे जरुरीचे आहे. जंगल पाण्याचे वडील आहेत; तर जमीन, नद्या ही पाण्याची आई आहे. पाणी नसेल तर आपण राहणार नाही. त्यासाठी पाण्याच्या आई-वडिलांना जपले पाहिजे. भीमाशंकरची हिरवी गर्मी ही निळ्या गर्मीला खेचून घेते व त्यातून पाऊस पडतो. जर, येथील जंगल राहिले नाही, तर पाउस पडणार नाही व पाऊस पडला नाही, तर नदी वाहणार नाही व शेतीला पाणी मिळणार नाही.
- डॉ. राजेंद्रसिंह,
जलतज्ज्ञ