भीमा कोरेगाव : जिल्हाभर उमटले पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 02:55 AM2018-01-03T02:55:51+5:302018-01-03T02:56:06+5:30

भीमा कोरेगाव (ता. शिरूर) येथील दोन गटांत झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरात भीम-छावा संघटना, आरपीआय आदी संघटनांनी शहरातून शांततेत मोर्चा काढला. या मोर्चामुळे शहरातील व्यापा-यांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली.

Bhima Koregaon: The district has been released all over | भीमा कोरेगाव : जिल्हाभर उमटले पडसाद

भीमा कोरेगाव : जिल्हाभर उमटले पडसाद

Next

शिरूरमध्ये शांततेसाठी मोर्चा
शिरूर : भीमा कोरेगाव (ता. शिरूर) येथील दोन गटांत झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरात भीम-छावा संघटना, आरपीआय आदी संघटनांनी शहरातून शांततेत मोर्चा काढला. या मोर्चामुळे शहरातील व्यापा-यांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली. मात्र, मोर्चेकºयांनीच व्यापाºयांना दुकाने उघडण्यास सांगून आमचा मोर्चा शांततेसाठी असल्याचे अप्रत्यक्षरित्या दाखवून दिले. भीमा कोरेगाव येथे जी घटना घडली. त्याचे तालुक्याचे गाव असणाºया शिरूरमध्ये तीव्र पडसाद उमटतील,असा काहींचा कयास असावा, मात्र शिरूर हे सर्वसामान्यांचे राज्यात आदर्श असणारे शहर आहे. सर्व समाजबांधव गुण्यागोविंदाने आणि समन्वयाने राहतात. याचा प्रत्यय राज्यात ज्या ज्या वेळी जातीय दंगली घडल्या त्यावेळी आला आहे. मात्र, प्रातिनिधीक स्वरूपात घटनेचा निषेध करण्यासाठी व उद्या (बुधवार) शहर बंदचे आवाहन करण्यासाठी भीम छावा, आरपीआयने केले. मोेर्चाचे निवेदन दिल्यानंतर नगरसेवक विनोद भालेराव, फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रामा झेंडे, भीम छावाचे शहराध्यक्ष प्रकाश डंबाळे, अविनाश शिंदे यांनी व्यापाºयांना दुकाने उघडण्यास सांगितले. मयूर भोसले, राकेश रणदिवे, अनिकेत तराळ, अक्षय ससाणे, अमित तराळ आदींसह कार्यकर्ते यावेळी मोर्चात सहभागी झाले.

इंदापूरला महामार्गावर रास्ता रोको

इंदापूर : भीमा कोरेगाव दंगलीच्या निषेधार्थ आंबेडकरवादी विचारांच्या संघटनांनी मंगळवारी इंदापुरात सुमारे २ तास रास्ता रोको करीत इंदापुरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला. बावडा व अंथुर्णे ही आजी-माजी आमदारांची गावे दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. उद्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये इंदापुरातील संघटना सहभागी होणार असल्याने उद्या शहर बंद राहणार आहे.
पोलीस प्रशासनाला कसलीही पूर्वसूचना न देता पुणे जिल्हा आरपीआयचे संघटक सचिव शिवाजीराव मखरे, तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे, बाळासाहेब सरवदे, अमोल मिसाळ, नितीन झेंडे, हनुमंत कांबळे, बाळासाहेब मखरे, राकेश कांबळे, संजय सोनवणे, संदेश सोनवणे, विकास भोसले व इतर कार्यकर्त्यांनी सकाळी ११ ते २ या वेळात एसटी बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे, जिल्हाधिकारी सौरभ राव, पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.आरपीआयचे बारामती लोकसभा विभागाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांनी निवेदनाद्वारे राज्यपालांकडे केली आहे.

गुरुवारी नीरा बंदची हाक
नीरा : भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ नीरा (ता.पुरंदर) येथील दीपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेच्या वतीने गुरुवार (दि. ४) रोजी नीरा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
नीरा पोलीस दूरक्षेत्राचे फौजदार राजेश माळेगावे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी नीरेचे माजी उपसरपंच कुमार मोरे, दादा गायकवाड, अमोल साबळे, अनिल मेमाणे उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मार्गाने निषेध मोर्चा काढण्यात येणार असून निषेध सभा घेण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अमोल साबळे यांनी दिली.

दौंडला कडकडीत बंद

दौंड : दौंड येथे भीम अनुयायांनी पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध करत संपूर्ण शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. भीमा कोरेगाव आणि वढू बुद्रुक येथील घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भीमक्रांती सेना, भीम वॉरियर्स, बहुजन समाज पार्टी, दलित पँथर या संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच भीम अनुयायांनी हा बंद पुकारला होता.
घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला होता. मोर्चाची सांगता दौैंड पोलीस ठाण्याजवळ झाली. या वेळी आंदोलकांनी तहसीलदार बालाजी सोमवंशी, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना निवेदन दिले. भीमा कोरेगाव आणि वढू बुद्रुक येथे काही समाजकंटकांनी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातच पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात न घेता निरपराध वयोवृद्ध लोकांवरच लाठीमार केला. यात एका निष्पाप युवकाचा मृत्यू झाला. शासनाने या घटनेची त्वरित दखल घेऊन सीबीआय चौैकशी करावी तसेच दोषींवर त्वरित कडक कारवाई करून त्यांना शासन करावे आणि मनुवाद्यांना सहकार्य करणाºया पोलीस अधिकाºयांची तातडीने उचलबांगडी करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. दौंड येथील मोर्चात प्रकाश भालेराव, सतीश थोरात, रोहीत कांबळे मच्छींद्र डेंगळे, अश्विन वाघमारे, राजेश मंथने संजीव आढाव, राजू त्रिभूवन, प्रमोद राणेरचपूत, भारत सरोदे, शितल मोरे, आशा मोहीते, शोभा वाल्मिकी, यांच्यासह भीम अनुयायी सहभागी झाले होते.

मृत तरुणाच्या कुटुंबीयांना मिळावी आर्थिक मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
कान्हूर मेसाई : कान्हूर मेसाई (घोलपवाडी) येथील राहुल बाबाजी फटांगडे (वय २५) या तरुणाचा डोक्यात दगड लागून मृत्यू झाला. गरीब कुटुंबातील या तरुणाचे सणसवाडी येथे गॅरेज असून दुचाकी दुरूस्त करून आपला प्रपंच चालवत होता. तो गेल्यामुळे संपूर्ण कुटुंबच पोरके व निराधार झाले आहे. शासनाने या घटनेची गंभीर दखल घेत मृत तरुणाच्या कुटुंबीयांस भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी सरपंच दादा खर्डे, माजी उपसरपंच दीपक तळोले यांनी केले.
दरम्यान या तरुणाचा अंत्यविधी रात्री उशीरा घोलपवाडी येथे पोलीस बंदोबस्तात करण्यात आला. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. हक यांच्या उपस्थितीत घोलपवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ कान्हूरमेसाई येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

Web Title: Bhima Koregaon: The district has been released all over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.