भीमा कोरेगाव 'विजयस्तंभाचा इतिहास', जाणून घ्या 1818 मध्ये काय घडलं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 11:17 AM2019-01-01T11:17:43+5:302019-01-01T11:22:12+5:30

भीमा-कोरेगाव येथे दरवर्षी लाखो अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी एकत्र येतात.

Bhima Koregaon, 'History of Vijaystambha', Know what happened in pune 1718 ? | भीमा कोरेगाव 'विजयस्तंभाचा इतिहास', जाणून घ्या 1818 मध्ये काय घडलं ?

भीमा कोरेगाव 'विजयस्तंभाचा इतिहास', जाणून घ्या 1818 मध्ये काय घडलं ?

googlenewsNext

मुंबई - भीमा-कोरेगाव येथे दरवर्षी लाखो अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी एकत्र येतात. मात्र, गतवर्षी झालेल्या गोंधळानंतर भीमा-कोरेगावला भेट देणाऱ्या अनुयायांची संख्या यंदा मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे. गतवर्षीच्या घटनेनंतर भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाचा इतिहास मोठ्या प्रमाणात वाचण्यात आला. मात्र, अद्यापही या विजयस्तंभाच्या इतिहासापासून अनेकजण अनभिज्ञ आहेत. त्यामुळे जाणून घेऊया नेमका काय आहे, या विजयस्तंभाचा इतिहास.       

भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 या दिवशी ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनीच्या कॅप्टन. एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वातील महार बटालियनच्या 500 सैनिकांनी 25000 पेशवा सैन्याचा पराभव केला. महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव भीमा येथे ब्रिटिशांनी विजयस्तंभ बांधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी याठिकाणी येत.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पेशव्यांनी मराठेशाही संपुष्टात आणली. पेशवाईत शूद्रांच्या गुणवत्तेस अत्यंत अल्प, मूल्यवाव होता. या कालखंडातील सर्व राज्यकर्त्यांनी महारादी सर्वच अस्पृश्य लढवय्या जातींचा फक्त आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला. त्यांच्या शौर्याचे केवळ काठी, तोडे, कडे इत्यादी नगण्य इनाम देऊन कौतुक केले. कधी कधी तर फक्त शाबासकी देऊनच बोळवण केली जाई. स्वराज्य व सुराज्याचा सक्रिय स्वाभिमान उरी बाळगणाऱ्या महारांनी आपल्या पराक्रमाने मराठी मुलखाची शान भारतखंडात वाढवून भगवा झेंडा मोठ्या अभिमानाने फडकत ठेवला. पण, त्यांची पायरी कधीच बदलली नाही. बाजी निंबाळकर व नेताजी पालकर या मुसलमान झालेल्या सरदारांना मोठ्या सन्मानाने हिंदू धर्मात घेतले. पुन्हा सरदारकी बहाल केली, परंतु अस्पृश्यांच्या गळ्यात मडके व कमरेला खराटा बांधून ठेवला जात असे. 

अस्पृश्यांवर होणाऱ्या पशुतुल्य अन्याय, अत्याचार व अस्पृश्यतेच्या विरोधात त्यावेळी महारांचे सरदार दुसरे सिदनाक यांनी स्वाभिमान प्रकट करून श्रीमंत बाजीराव पेशव्यांना विनंती केली. त्यानुसार, पेशवाईत महारादी अस्पृश्य जाती-जमातींना अस्मितेने वागवले जावे. महार सैनिक मायभूमीसाठी प्राण देण्यास तयार आहेत. पण, त्यांची ही विनंती पेशव्यांनी अमान्य केली होती आणि म्हणून महारांची संख्या अल्प असूनही ते पेशव्यांविरुद्ध आणि इंग्रजांच्या बाजूने अत्यंत शौर्याने व त्वेषाने लढले. 

महार सैनिक ब्रिटिशांच्या आमिषाला बळी पडून किंवा पोटासाठी पेशव्यांच्या विरोधात लढले नसून त्यांची लढाई समता, अस्मिता यासाठी होती. अस्पृश्यतेच्या विरोधात पुकारलेले हे त्यांचे प्रथम बंड होते. भीमा कोरेगाव हे युद्ध पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावरील भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात लढले गेले. इंग्रजांनी महारांच्या बळावर पेशवाईविरुद्ध हे युद्ध लढले असले तरी याचे खरे स्वरूप अस्पृश्यता व अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई असेच होते. महार मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले. ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे, तर जाचक पेशवाई नष्ट करणे हे त्यांचे एकच ध्येय होते. हजारो वर्षांच्या अन्यायाला कायमची मूठमाती देण्यासाठी पेटलेल्या मानसिकतेची जिद्द महार बटालियनमध्ये होती. या लढाईच्या निमित्ताने महारांना नामी संधी मिळाली. या युद्धात पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या जवळपास 30 हजार होती. त्यापैकी 5 हजार पायदळ व 25 हजार घोडदळ होते. तर, 20 हजार निवडक प्रशिक्षित अरब घोडेस्वार होते. त्या तुलनेत इकडे इंग्रजप्रणीत केवळ 834 महार सैनिक होते. तरीही निकराचा लढा देऊन त्यांनी आपल्यापेक्षा 40 पट जास्त असलेल्या पेशवाईच्या सैन्याचा पराभव केला. 

इंग्रजांच्या बाजुने लढताना पेशवाईविरुद्ध 16 तास झुंज देऊन महार सैनिकांनी अखेर 1 जानेवारी 1818 च्या सायंकाळी 6 वाजता पेशव्यांच्या बलाढ्य सैन्यावर कब्जा केला. एवढ्या मोठ्या सैन्यापुढे एवढ्याशा सैन्याचा टिकाव लागणे अशक्यप्राय होते. तशी परिस्थितीसुद्धा निर्माण झाली होती. पण, न्यायासाठी मरण पत्करू अशा बाण्याने महार सैनिक प्राणपणाने लढले. कोणत्याही परिस्थितीत आपणास माणसाचे जगणे जगू दिले जात नाही. जगू दिले जाणार नाही, असे मृत जीवन जगण्यापेक्षा न्यायासाठी, हक्कासाठी लढत लढत मेलेले बरे, असा विचार महार सैन्याने केला होता. भीमा कोरेगावच्या या लढाईत शूद्र-महार सैनिकांनी शेवटी इंग्रजांना विजय मिळवून दिला. इंग्रजांनी यापूर्वी पेशवाईशी दोन वेळा केलेल्या लढाईत इंग्रजांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. कोरेगावच्या या लढाईत 834 शूद्र-महार सैनिकांपैकी 275 तर पेशव्यांच्या 30 हजारपैकी 600 सैनिक कामी आले.

Web Title: Bhima Koregaon, 'History of Vijaystambha', Know what happened in pune 1718 ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.