कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी प्रशासन सज्ज; पाच हजार पोलिसांचा असणार बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 01:55 PM2018-12-29T13:55:49+5:302018-12-29T14:02:21+5:30
गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासन सज्ज झाले असून तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पुणे - गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासन सज्ज झाले असून तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर 12 एस आर पी एफच्या तुकड्या, बाराशे होमगार्ड व दोन हजार समता सैनिक दलाचे स्वयंसेवक तैनात असणार आहेत अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरेपाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील उपस्थित होते.
गेल्या वर्षी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीत करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या दंगलीचे परिणाम देशभरात उमटले होते. त्यामुळे यंदा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. नांगरेपाटील म्हणाले, कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. घातपात विरोधी पथक सुद्धा तैनात करण्यात येणार आहे. गावातील लोकही स्वागतासाठी उभे राहणार आहेत. जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट तयार करण्यात येणार आहे. जे लोक जातीय तेढ निर्माण करतात आणि शांततेस बाधा ठरतील अशा लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडिया वर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. येणाऱ्या लोकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे.