भीमा-पाटसचे सेवानिवृत्त कामगार न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:14 AM2019-02-19T00:14:01+5:302019-02-19T00:14:15+5:30
वास्तविक पाहता कारखान्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यातच सेवानिवृत्त कामगारांसह सध्याच्या परिस्थितीत कामावर असलेल्या कामगारांची देणी द्यावयाची आहेत.
भीमा कारखान्याच्या सेवानिवृत्तांच्या देय रकमांसाठी अनेकदा पाठपुरावा करूनही भीमा कारखान्याकडून पैसे दिले गेले नाहीत. त्यामुळे नाईलाजाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ५ फेब्रुवारीपासून चक्री उपोषण सुरु होते. उपोषण सुरु होऊन १४ दिवस झाले मात्र अद्याप कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांनी उपोषणस्थळी सेवानिवृत्त कामगारांची भेट घेतली नाही. याउलट उपोषण स्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कारखान्याच्या विश्रामगृहावर आंदोलकांना चर्चेला बोलावले अशी खंत उपोषणकर्त्या कामगारांची आहे.
वास्तविक पाहता कारखान्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यातच सेवानिवृत्त कामगारांसह सध्याच्या परिस्थितीत कामावर असलेल्या कामगारांची देणी द्यावयाची आहेत. अशा परिस्थितीत समन्वयाने प्रश्न सुटू शकतो. मात्र या उपोषणकर्त्यांचा प्रश्न ताटकळत ठेवला जात असल्याची वस्तुस्थिती उपोषणकर्ते कामगारांनी स्पष्ट केली आहे. उपोषणस्थळी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, पंढरीनाथ पासलकर, विकास शेलार, तुकाराम ताकवणे, या संचालकांनी भेट दिली, पण त्यांच्या हातात आर्थिक कारभार नाही. याउलट ज्यांच्याकडे निर्णय क्षमता आहे ते कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी मात्र उपोषणस्थळी कामगारांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. परिणामी चर्चेसाठी उपोषणकर्त्यांना विश्रामगृहावर बोलावले. त्यानुसार नानासाहेब दिवेकर, सुरेश निंबाळकर, शहाजी जाधव, अशोक शितोळे, बाळासाहेब जगदाळे ही वयस्कर मंडळी वयाचे भान न ठेवता वयाने लहान असलेल्या अध्यक्षांकडे चर्चेसाठी विश्रामगृहावर गेले. तेथेही या कामगारांच्या पदरी निराशा आली. किमान त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासनसुद्धा त्यांना मिळाले नाही. उलट कारखान्याचे राजाकारण आणि आर्थिक परिस्थितीचे गाºहाणे ऐकावे लागले.
कारखाना अडचणीत आहे, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा सेवानिवृत्त कामगार आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन हा प्रश्न टप्प्याटप्प्यानी का होईना सोडवला पाहिजे. यासाठी ताठर भूमिका महत्त्वाची ठरणार नाही. यासाठी भीमा पाटसच्या प्रशासनाने दोन पावले मागे येऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करणे महत्त्वाचे आहे. त्यातूनच मार्ग निघेल. उपोषणाच्या पहिल्या दिवशी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब निभे यांनी भेट दिली. त्यांनी कामगारांबरोबर केलेली चर्चा मात्र निष्फळ ठरली.
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २१३ सेवानिवृत्त कामगारांच्या देणी संदर्भातील प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यांना सेवानिवृत्तीनंतरचे मिळणारे अंदाजे ७ कोटी रुपये पैैसे त्यांच्या पदरी पडलेले नाहीत. किंबहुना हक्काचे पैैसे मिळावे म्हणून त्यांनी कारखाना व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला. परंतु त्यांच्या पदरी हेंडसाळाच आल्याने नाईलाजास्तव या सेवानिवृत्त कामगारांनी भीमा-पाटस कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ चक्री उपोषण सुरु केले आहे.
१६ कामगारांच्या वारसांचे काय?
२१३ सेवानिवृत्त कामगारांपैैकी १५ कामगार हयात नाहीत तर गेल्या दोन दिवसांपूर्वी विलास कुलुंगे या कामगाराचा मृत्यू झाला, असे एकूण १६ मयत कामगार आहेत. तेव्हा जिवंत असलेल्या कामगारांची न्याय्य हक्कासाठी हेंडसाळ होत आहे. तर मयत झालेल्या १६ कामगारांच्या वारसांच्या पदरी काय पडणार आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.