भीमा-पाटसला ‘काम बंद’
By admin | Published: March 14, 2016 01:22 AM2016-03-14T01:22:01+5:302016-03-14T01:22:01+5:30
भीमा-पाटस कारखान्याच्या कामगारांनी कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात रविवारी (दि. १३) काम बंद आंदोलन करून प्रवेशद्वारावर काळ्या फिती लावून निषेध केला
कुरकुंभ : भीमा-पाटस कारखान्याच्या कामगारांनी कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात रविवारी (दि. १३) काम बंद आंदोलन करून प्रवेशद्वारावर काळ्या फिती लावून निषेध केला.
गेल्या ९ महिन्यांपासून कामगारांचे थकीत पगार
व इतर मागण्यांसाठी शनिवारी (दि. १२) कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, संचालक आबा खळदकर व कामगार संघाचे सदस्य यांच्यात चर्चा सुरू होती. चर्चेदरम्यान बारवकर
यांनी दमबाजी व शिवीगाळ केल्याप्रकरणी कामगार संघटनेच्या वतीने हा निषेध केला.
याबाबत कामगार संघटनेचे अध्यक्ष अर्जुन दिवेकर म्हणाले की, थकीत पगारापोटी १४ कोटी, तर निवृत्त झालेल्या कामगारांना ७५ लाख रुपये येणे बाकी आहे. याबाबत कारखाना व्यवस्थापन गेली अडीच वर्षे टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे.
या वर्षी ऊस हंगामात कारखान्याचे गाळप कमी झाल्याचे कारण व्यवस्थापन कामगारांच्या
माथी मारत असल्याने कामगारांना जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. यातच बारवकर यांनी शिवीगाळ केली आहे.
जोपर्यंत यापुढील चर्चेला कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल येत नाहीत व कामगारांची सर्व देणी देण्यात येत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन केले जाणार असल्याचे दिवेकर यांनी सांगितले.
संघटनेचे सदस्य रामभाऊ बरकटे, हनुमंत वाबळे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, व्यवस्थापनाची ही दादागिरी खपवून घेणार नसल्याचे सांगितले.
या वेळी कामगार संघटनेचे रामभाऊ बरकडे, हनुमंत वाबळे, संजय शितोळे यांच्यासह कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)