भीमा नदीपात्र पडले कोरडे; दौंड पूर्व भागातील पशुधन जगवणे कठीण

By admin | Published: May 22, 2016 12:45 AM2016-05-22T00:45:44+5:302016-05-22T00:45:44+5:30

दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने परिसरातील पाटेठाण, टाकळी भीमा, पानवली, वडगाव बांडे, कोरेगाव भिवर, आलेगाव या नदीच्या काठावर

Bhima river falls flat; Pre-production of livestock in Daund East Zone is difficult | भीमा नदीपात्र पडले कोरडे; दौंड पूर्व भागातील पशुधन जगवणे कठीण

भीमा नदीपात्र पडले कोरडे; दौंड पूर्व भागातील पशुधन जगवणे कठीण

Next

पाटेठाण : दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने परिसरातील पाटेठाण, टाकळी भीमा, पानवली, वडगाव बांडे, कोरेगाव भिवर, आलेगाव या नदीच्या काठावर असलेल्या गावांत जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्यासंदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भीमा नदीच्या काठावरील असलेल्या शेतातील हिरवीगार पिकेदेखील पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर असून, काही करा परंतु धरणाच्या उपलब्ध पाणी साठ्यामधून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
भीमा नदीच्या पाण्यावर दौंड व शिरूर व हवेली या तालुक्यातील पेरणे, पिंपरी सांडस, विठ्ठलवाडी, पाटेठाण, मेमाणवाडी, टाकळी भीमा, अरणगाव, पानवली, वडगाव बांडे, कोरेगाव भिवर, आलेगाव पागा या गावांसह अनेक गावे शेतीसाठी अवलंबून आहेत. नदीची पाणीपातळी तळाला गेली असून, कृषिपंप नदीच्या मध्यावर नेऊनदेखील नदी कोरडी ठणठणीत पडल्याने काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या परिसरातील उभी पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. काही ठिकाणी शिल्लक राहिलेल्या नदीचा खोलगट भाग व झरे यामधून शेतकरी पाणी नेऊन पिके जगवण्याची धडपड करताना दिसून येत आहे.
भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने या परिसरात शेतीच्या पाण्याबरोबरच जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस होईल तोपर्यंत एखादे आर्वतन सोडले, तर या परिसरात असलेली पाण्याची समस्या कमी होण्यास निश्चितच मदत होईल. मागील काही दिवसांपूर्र्वी धरणातून आर्वतन सोडण्यात आले होते. त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला होता.
पाण्याअभावी या परिसरातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कोरडे ठणठणीत पडले असून, धरणाच्या उपलब्ध पाणीसाठ्यातून पाऊस होईल तोपर्यंत तरी एखादे आर्वतन सोडण्यात यावे, अशी मागणी येथील शेतकरीवर्ग, तसेच ग्रामस्थ करीत आहेत.
राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमधील पशुधन जगवणे अतिशय कठीण झाले असून, पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न दुग्धउत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे.
शासनाने १५ मार्च २0१६ रोजी दौंड तालुक्यातील ५0 पैशांपेक्षा कमी आणेवारी असणारी ३२ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. त्यातील बोरीबेल, गाडेवाडी, रावणगाव, नंदादेवी, स्वामी चिंचोली, लोणारवाडी या पूर्व भागातील गावांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून या गावातील जिरायत पट्ट्यातील खरीप व रब्बी हंगाम पावसाअभावी वाया गेला आहे. यावर्षी या भागात अत्यल्प झालेल्या पावसामुळे पिण्याचे पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे या परिसरातील माणसांबरोबरच पशुधन कसे जगवायचे, हा प्रश्न पडला आहे.
या भागातून खडकवासला कालवा जात असल्याने या भागातील शेतकरी प्रामुख्याने ऊस हे पीक मोठ्या प्रमाणावर घेत आलेला आहे. उसाबरोबरच या भागातील शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करत आलेला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना प्रपंच चालवायला दुग्धव्यवसायच प्रमुख आधार झालेला आहे. यंदा तोच व्यवसाय संकटात सापडला असल्याने त्याचे कंबरडे मोडून गेले आहे. भीमा नदीपात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक राहिला नाही. तसेच विहिरी, कूपनलिका इत्यादी पाण्याचे स्रोत केव्हाच आटून गेले आहेत. या परिसरातील गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, मागणी करूनही अनेक गावे व वाड्या-वस्त्यांवर चार-चार दिवस टँकरच्या खेपा होत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. माणसालाच वेळेला पाणी पिण्यासाठी मिळत नाही, तर जनावरांचे काय? अशी दुर्दैवी वेळ दुग्धउत्पादकांवर दुष्काळामुळे आली आहे. हिरवा चारा तर सोडाच, पण वाळलेला ऊसही जनावरांना खायला मिळेनासा झाला आहे. जनावरांना पोषक आहार मिळत नसल्याने त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेत परिणाम झालेला आहे. शिवाय, जनावरांना वेळच्या वेळी चारा व पाणी मिळत नसल्याने त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. जनावरांची छावणी व चारा डेपोसाठी वारंवार मागणी करूनही शासनाला घाम फुटला नसल्याने शासनाने या मागणीकडे काणाडोळा केल्याचे चित्र आहे.

Web Title: Bhima river falls flat; Pre-production of livestock in Daund East Zone is difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.