भीमाकाठ दुतर्फा होणार हिरवागार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 04:51 AM2017-08-06T04:51:19+5:302017-08-06T04:51:19+5:30
नमामि चंद्रभागा अभियानांतर्गत भीमा नदीपात्राच्या दुतर्फा पाचशे मीटरपर्यंत तब्बल ४ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग विकसित करण्यात येणार असून, नजीकच्या काळात हा हरित पट्टा दहा
पुणे : नमामि चंद्रभागा अभियानांतर्गत भीमा नदीपात्राच्या दुतर्फा पाचशे मीटरपर्यंत तब्बल ४ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग विकसित करण्यात येणार असून, नजीकच्या काळात हा हरित पट्टा दहा किलोमीटरपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती नमामि चंद्रभागा प्राधिकरणाचे सचिव तथा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत दळवी यांनी ही माहिती दिली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सौरभ राव, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूरचे (निरीचे) प्रमुख संशोधक एन. एन. राव या वेळी उपस्थित होते.
भीमा नदीचा उगम असलेल्या भीमाशंकरपासून ते राज्याच्या सीमेपर्यंत हरित पट्टा विकसित करण्याचा मानस आहे. याशिवाय या नदीसह तिच्या उपनद्या व मोठ्या नाल्यांवरील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येतील.
पहिल्या टप्प्यात भीमानदीकाठी दुतर्फा पाचशे मीटर क्षेत्रावर फळबागांची लागवड करण्यात येणार आहे. ही फळबाग लागवड सुमारे ४ हजार हेक्टरवर असेल. या माध्यमातून दहा किलोमीटर लांबीचे एकाच फळझाडांचा पट्टा विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यावरण विभागाकडून १६.८० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच, चंद्रभागा नदी संवर्धन अभियानदेखील राबविण्यात येणार आहे. त्यानुसार चंद्रभागा नदी २०२२ पर्यंत प्रदूषणमुक्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
- चंद्रकांत दळवी, आयुक्त