तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त भीमाशंकरला लाखांवर भाविक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:04 AM2018-08-28T01:04:06+5:302018-08-28T01:04:32+5:30
तिसरा श्रावणी सोमवार : राजकीय पुढारीही शिवपिंडीपुढे झाले लीन
भीमाशंकर : श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारी एक लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. पहिल्या दोन सोमवारच्या तुलनेत या तिसºया सोमवारी गर्दी कमी दिसली; तसेच अनेक राजकीय नेत्यांनी भीमाशंकरचे दर्शन घेतले. पाऊस व दाट धुक्याच्या वातावरणात दर्शनरांगेत उभे राहून भाविक दर्शनाचा लाभ घेत होते. सोमवारनिमित्त प्रशासनाने जोरदार तयारी केली होती. चोख पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. मात्र, या सोमवारी फारशी गर्दी दिसली नाही. श्रावणाच्या पहिल्या पंधरा दिवसांत अनेक सुट्या आल्याने भाविकांची मोठी गर्दी भीमाशंकरला पाहायला मिळाली; तसेच सोमवार पेक्षा रविवार व सुट्यांच्या दिवशी भाविकांची संख्या जास्त होती.
या सोमवारी वाहतुकीचे योग्य नियोजन झाल्यामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही. तसेच, स्वकाम सेवा मंडळाचे कार्यकर्ते मंदिर परिसर स्वच्छ करताना दिसत होते. आळंदी येथील हे मंडळ दर सोमवारी भीमाशंकर मंदिर व परिसराची स्वच्छता करण्याचे महत्त्वाचे
काम करते. भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे हे मंदिर परिसरात थांबून यात्रेचे नियोजन करत होते. यात्रा संपल्यानंतर स्वच्छतेचे काम देवस्थान हाती घेणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे तिसºया श्रावणी सोमवारी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्निक दर्शन घेतले. शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार व भीमाशंकर देवस्थानचे विश्वस्त शिवाजीराव आढळराव पाटील, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, माजी आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आदींनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.
अमरनाथ सेवा संघ मंचर व शिवांजली सखीमंच भोसरी यांनी श्रावणी सोमवारनिमित्त मोफत फराळ वाटप ठेवले होते. अमरनाथ सेवा संघाने प्रत्येक सोमवारी फराळ वाटप ठेवले आहे. तसेच शिवांजली सखीमंचमध्ये आमदार महेश लांडगे स्वत: भाविकांना फराळ वाटप करत होते.
भुलेश्वरी भाविकांची मांदियाळी
भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर येथे श्रावणातील तिसºया सोमवारी दिवसभरात हजारो भाविकांनी रांगेत शिवलिंगाचे दर्शन घेतले. पहाटे शिवलिंगास दही, दूध व पंचामृताने अंघोळ घालण्यात आली. महाआरती करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. पहाटे संपूर्ण मंदिर धुक्यामध्ये हरवल्याचे पाहावयास मिळाले. या नयनमनोहारी दृश्यामुळे भाविकांमध्ये उत्साह दिसून येत होता.
माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने सकाळी सहा वाजता जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी सपत्निक महापूजा केली. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, सदस्य दत्ता झुरंगे, मनीषा तावरे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, सोनाली यादव, श्रीक्षेत्र भुलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण यादव, माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके, उपसरपंच माऊली यादव, सोसायटीचे चेअरमन दिलीप गायकवाड उपस्थित होते. दुपारी बारा वाजता पाण्याच्या कुंडामध्ये अंघोळ घालण्यात आली. महाआरती होऊन कावड व पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. आरती दुपारी तीन वाजता मानाच्या कावडींची धार घालण्यात आली. कावडींची धार घालताना वरूणराजाने सुरुवात केली. मंदिरासमोर पालखीची आरती करण्यात आली. यानंतर मंदिरात प्रदक्षिणा घालून आजच्या यात्रेची सांगता करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डॉ. विवेक आबनावे यांनी भाविकांना आरोग्य सेवा दिली. ग्रामपंचायतीच्या वतीने दिवसभर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलिस बंदोबस्त देण्यात आला. पुरातत्त्व विभागाचे संवर्धन सहायक शैलेंद्र कांबळे, राहुल बनसोडे, साईनाथ जंगले व भुलेश्वर पुजारी व ग्रामस्थ यांनी यात्रेचे नियोजन केले.