'भीमाशंकर महाराज की जय', पहिल्या श्रावणी सोमवारी लाखो भाविक भोलेनाथांच्या चरणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 06:21 PM2023-08-21T18:21:18+5:302023-08-21T18:21:39+5:30
रिमझिम पाऊस, गडद धुके व बोचरी थंडी यामध्ये भाविक पवित्र शिवलिंगाचे दर्शनासह पर्यटनाचा आनंद घेत होते
भीमाशंकर : 'जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय' च्या जयघोशात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी सुमारे दिड ते दोन लाख भाविकांनी दर्शनासाठी भीमाशंकर ला भेट दिली. नागपंचमीनिमित्त सभामंडपात नागाची व मंदिरात शंभु महादेवाची प्रतिकृती विविध फुलांनी उभी करण्यात आली होती.
बारा ज्योतिर्लिगापैकी एक असणारे भीमाशंकर येथे श्रावण महिन्यात भाविकांची भक्तीमय वातावरणात मोठी गर्दी होत असते. मागील एक महिना अधिक श्रावण असल्याने भीमाशंकरला मोठी गर्दी पाहायला मिळाली आता चालू श्रावण सुरू झाल्यापासून देखील भीमाशंकरला मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावर्षी शनिवार रविवार व पहिल्या श्रावणी सोमवारी मोठी गर्दी दिसली. दर्शन रांगेत उभे राहून दर्शनासाठी वेळ लागत असल्याने अनेकजण मुखदर्शन, कळस दर्शन घेवून माघारी येत होते. रिमझिम पाऊस, गडद धुके व बोचरी थंडी यामध्ये भाविक पवित्र शिवलिंगाचे दर्शनासह पर्यटनाचा आनंद घेत होते.
शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवसांत सुमारे पाच लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी आल्याचा अंदाज व्यक्त केला होता. पहिलाच सोमवार असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, किशोर वागज, निखिल मगदुम, जिजाराम वाजे यांनी योग्य ती खबरदारी घेत चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहनतळ ते बसस्थानका पर्यंत एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिक्षक गोविंद जाधव, तुकाराम पवळे, वसंत आरगडे, चंद्रकांत शितोळे, मारूती खळदकर भाविकांना एसटीच्या मोठया बस, मिनिबसचे नियोजन केले. मंदिरामध्ये देवस्थान अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, दत्तात्रय कौदरे, रत्नाकर कोडिलकर, गोरक्षनाथ कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे भाविकांना चांगले दर्शन व्हावे यासाठी प्रयत्न करत होते.