भीमाशंकर, पाटण, आहुपे खोऱ्यात दरडी कोसळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:09 AM2021-07-25T04:09:42+5:302021-07-25T04:09:42+5:30
तळेघर : गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे भीमाशंकर-पाटण, आहुपे खोऱ्यामध्ये दरड कोसळत असून त्यामुळे घाटातील रस्ते ...
तळेघर : गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे भीमाशंकर-पाटण, आहुपे खोऱ्यामध्ये दरड कोसळत असून त्यामुळे घाटातील रस्ते बंद होऊन भीमाशंकर-पाटण खोरे व कुशिरे -भोईरेवाडी यांच्यातील संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे.
काल झालेल्या पावसामध्ये नानवडे गावाच्या हद्दीमध्ये डोंगर खचल्यामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे खोऱ्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. भीमाशंकर पाटण ही दोन खोरी आहुपे खोऱ्याशी जोडणारा नागमोडी वळणाचा रस्त्यावर दरडी कोसळल्याने खचला आहे. काही ठिकाणी रस्ता वाहून गेल्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. घाटाच्या कडेला असणाऱ्या डोंगरावरचे मोठमोठाले दगड रस्त्यावर येऊन पडले आहेत. त्यामुळे घाट बंद होऊन भीमाशंकर-पाटण खोऱ्याचा आहुपे खोऱ्याशी संपर्क तुटेल की काय, अशी भीती या भागातील लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.
कुशिरे बुद्रूकच्या पाठीमागे नानवडे गावच्या हद्दीमध्ये ढकेवाडीच्या खालील बाजूस खालील असणाऱ्या दाते वस्तीवरील बाजूचे डोंगर खचून माती व मोठे दगड खाली आल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागामध्ये आजारी पडलेला रुग्ण भीमाशंकर खोऱ्यामध्ये असणाऱ्या तळेघर येथे यावे लागते; परंतु या घाटामध्ये दरडी कोसळतील या भीतीने संपूर्ण डिंभे धरणाला वळसा घालून डिंभ्यावरून तळेघरला यावे लागते. आहुपे खोऱ्यातील गावे ही अतिशय डोंगर दऱ्या-खोऱ्यांमध्ये वसली आहेत. या भागामध्ये कोणत्याही सोयी-सुविधा नसल्यामुळे या भागातील आदिवासी जनतेला भीमाशंकर खोऱ्यामध्ये नेहमीच यावे जावे लागते. आहुपे भागातील आदिवासी बांधवांची पाटण व भीमाशंकर परिसरामध्ये दररोजची वर्दळ असते.
पाटण खोऱ्यामध्ये असणारी कुशिरे बुद्रूक व कुशिरे खुर्द ही गावे या घाटाच्या पायथ्याशी वसली आहेत. या घाटामध्ये दरडी कोसळल्यावर मोठमोठाले दगड या गावावरती येतात. कुशिरे गावातील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत असल्याचे येथील ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
--
चौकट
आहुपे खोऱ्यातील आहुपे, पिंपरगणे, अघाणे, डोण, तिरपाड, नानवडे, कोंढरे, भोईरवाडी या गावांतील आदिवासी बांधवांना आठवडे बाजार, दवाखाना विविध शासकीय कार्यालय, शाळा या गोष्टी भीमाशंकर खोऱ्यामध्ये यावे लागते. या भागातील लोकांना येण्या-जाण्यासाठी कोंढरे-भोईरवाडी मार्गे कुशिऱ्याचा घाट उतरून म्हाळुंगेमार्गे तळेघरला यावे लागते. याच रस्त्यावरती असणाऱ्या कुशिरे-भोईरवाडी दरम्यान असणाऱ्या अतिशय नागमोडी वळणे असणाऱ्या या घाटामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून मोठे दगड-गोटे रस्त्यावर आल्याने बऱ्याचदा या रस्त्यावरील वाहतूक बंद होऊन या तीनही खोऱ्यांचा संपर्क तुटला जातो. पावसाळ्यामध्ये या भागातील आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात.
----
फोटो क्रमांक : २४ तळेघर दरड कोसळली
फोटो खालचा मजकुर : कुशिरे-भोईरवाडी रस्त्यावर घाटामध्ये दरड कोसळल्याने झालेल्या रस्त्याची बिकट व भयानक अवस्था (छाया : संतोष जाधव)
240721\24pun_2_24072021_6.jpg
फोटो खालचा मजकुर:-फोटो कुशिरे-भोईरवाडी रस्त्यावर घाटामध्ये दरड कोसळल्याने झालेल्या रस्त्याची बिकट व भयानक अवस्था (छाया संतोष जाधव) फोटो क्रमांक : २४तळेघर दरड कोसळल