भीमाशंकर रस्त्याने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:12 AM2021-09-19T04:12:54+5:302021-09-19T04:12:54+5:30
घोडेगाव : घोडेगाव, डिंभे, शिनोलीमधून गेलेल्या भीमाशंकर रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यामुळे येथील परिसर मोकळा झाला असून जणू या रस्त्याने मोकळा ...
घोडेगाव : घोडेगाव, डिंभे, शिनोलीमधून गेलेल्या भीमाशंकर रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यामुळे येथील परिसर मोकळा झाला असून जणू या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असल्याचे चित्र आहे.
घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी रस्त्यावर झालेली अतिक्रमणे व बेशिस्त वाहने काढण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. यासाठी स्थानिक ग्रामपंचायत, नागरिक व व्यापाऱ्यांना विश्वात घेऊन कारवाई करत आहेत.
भीमाशंकर रस्ता व घोडेगावमधील अंतर्गत रस्त्यांवर बेशिस्त प्रकारे वाहने लावलेली जात असल्याने, तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली असल्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होत होती.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख दौऱ्यावर असताना त्यांनी भीमाशंकर रस्ता व घोडेगावमधील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यांच्या आदेशानुसार घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी घोडेगाव, शिनोली, डिंभे येथील ग्रामपंचायतीला बरोबर घेऊन भीमाशंकर रस्त्यावर व घोडेगावमधील अंतर्गत रस्त्यावर असलेली अतिक्रमणे व बेशिस्त वाहने नागरिक व व्यापाऱ्यांना विनंती करून काढून घेतली आहेत.
घोडेगावमध्ये तालुक्यातून दररोज माणसे आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी येतात. तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असल्याने पश्चिम आदिवासी भागातील लोक बाजारहाटासाठी येतात, तसेच भीमाशंकर मंचर हा मुख्य रस्ता घोडेगाव, डिंभे, शिनोली या मोठया गावांमधून जातो. या रस्त्यावर बेशिस्त वाहनांमुळे व अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत होती. ती दूर करण्यासाठी घोडेगाव पोलिसांनी रस्त्याच्या कडेला पी.ए. प्रणालीद्वारे वाहन लावण्याची व्यवस्था करून दिली आहे.
घोडेगावमधील बाजारपेठेत रस्त्यावर भरणारा बाजार व्यापारी, शेतकरी यांना विनंती करून श्री हरिश्चंद्र महादेव देवस्थानच्या जागेत नियमित भरविण्यास सुरुवात केल्याने बाजारपेठेतील गर्दी कमी झाली आहे. दररोज सकाळी पोलीस ठाण्यातून एक अधिकारी व दहा कर्मचारी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दोरखंड व फक्कीद्वारे रेषा मारून रस्त्याच्या कडेला वाहने लावण्याची जागा निश्चित करून देतात व मारून दिलेल्या रेषेच्या आत वाहने लागतील यासाठी प्रयत्नशील असतात.
--
चौकट
--
घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीत वाहनचालक, व्यापारी व नागरिकांनी वाहतूक नियमन व वाहनतळ व्यवस्था यासाठी प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांना साथ द्यावी. यातून अतिरिक्त गर्दी टाळून कोरोना महामारीला लांब ठेवता येईल तसेच वाहतूक नियमांचे पालन होऊन गाडी चालवणाऱ्या व पायी चालणाऱ्यांना होणारा मनस्ताप कमी होणार आहे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी केले आहे.
--
फोटो क्रमांक -
१८ घोडेगाव भीमाशंकर रस्ता मोकळा श्वास
१८ घोडेगाव भीमाशंकर रस्ता शिस्त