Pune | भीमाशंकरला पहिल्यांदाच स्ट्रॉबेरीचे पीक; वन विभागाकडून पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 09:06 PM2023-03-04T21:06:26+5:302023-03-04T21:10:02+5:30
भीमाशंकर जंगलाच्या जवळ राहणाऱ्यांना ट्रेनिंग देऊन स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी प्रोत्साहन...
पुणे : भीमाशंकर अभयारण्याच्या परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांना स्ट्रॉबेरी पीकाची लागवड करून त्यातून चांगला फायदा व्हावा म्हणून खास वन विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. भीमाशंकर जंगलाच्या जवळ राहणाऱ्यांना ट्रेनिंग देऊन स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यातून ते चांगले पैसे कमवत आहेत.
भीमाशंकर अभयारण्याच्या जवळील गावांतील बहुतांश आदिवासी जंगलातील उपजावर अवलंबून आहेत. ते शेती देखील करतात. परंतु, शेतात खूप काही करता येत नाही. म्हणून आयसीआयसीआय फांउडेशच्या सहकार्याने वन विभागाने स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी त्यांना मदत केली आहे. हा पुढाकार उपवनसंरक्षक तूषार चव्हाण यांनी घेतला आहे. सुरवातीला केवळ पाच गावांमध्ये हा प्रयोग होत आहे. कारण महाबळेश्वरसारखेच हवामान भीमाशंकरच्या परिसरात पहायला मिळते. त्यामुळे तेथील २५ शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी पीक घेण्याचे ट्रेनिंग दिले आहे. त्यातून शेतकऱ्यांना लागवड कशी करावी, त्यांची देखभाल कशी करावी याचे ट्रेनिंग त्यांना दिले होते. कारण शेतकऱ्यांना या पीकाबद्दल काहीच माहिती नव्हती. तसेच लागवडीसाठी रोपे व इतर साहित्य आयसीआयसीआय फांउडेशनच्या वतीने केली आहे.
सध्या येथील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीचे उत्पादन मिळत आहे. नोव्हेंबरपासून त्यांना स्ट्रॉबेरी मिळू लागली आणि त्यांनी त्याची विक्री रस्त्यालगत, शेतालगत सुरू केली. पर्यटकांना येथील स्ट्रॉबेरी आवडत असून, शेतकऱ्यांच्या हातातही पैसा येऊ लागला आहे.
भीमाशंकर परिसरात यापूर्वी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आलेली नाही. तरी देखील यंदा स्ट्रॉबेरीचे उत्पादन चांगले झाले आहे. नोव्हेंबरपासून उत्पादन सुरू झाले आणि लगेच विक्री देखील झाली. भीमाशंकर मंदिराच्या परिसरात ही विक्री होते. स्ट्रॉबेरीची शेती भीमाशंकर अभायरण्याजवळील कोंढवळ, भोरगिरी, त्रिपाद, पिंपरगणे, पाटण, राजपूर गावांमध्ये घेण्यात आले.
भीमाशंकरलगतच्या पाच गावांमधील २५ गुंठ्यांमध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्यात आले. पुढच्या वर्षी हे उत्पादन वाढविण्यात येणार आहे. कारण यंदा हा प्रायोगिक उपक्रम झाला. कारण पहिल्यांदाच पीक घेतले जात होते. तसेच त्याला प्रतिसाद कसा मिळतो, ते पाहिले गेले. यंदा पीकही चांगले आले आणि शेतकऱ्यांना पैसेही चांगले मिळाले आहेत. भीमाशंकर स्ट्रॉबेरी हा नवीन ब्रॅन्ड तयार केला असून, भविष्यासाठी तरूणांना देखील ट्रेनिंग दिले जात आहे. जेणेकरून त्यांच्यातील कौशल्य विकसित होतील.
- तूषार चव्हाण, उपवनसंरक्षक (वन्यजीव), पुणे