मावळातून ट्रेकला सुरुवात; भीमाशंकरला अर्ध्यावरच आयुष्य संपले, ट्रेकर्सचा हृदयविकाराने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 12:20 PM2023-07-17T12:20:26+5:302023-07-17T12:22:52+5:30
भीमाशंकर कडे येत असताना गुप्त भीमाशंकर येथे रमेश पाटील हे अचानक चक्कर येऊन खाली पडले
तळेघर : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असणारे भीमाशंकर कडे ट्रेकिंग करून येत असताना पिंपरी चिंचवड येथील पिंपळे नीलख येथील एका ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. रमेश भगवान पाटील ( ५७) असे मृत झालेल्या ट्रेकर्सचे नाव आहे. ते पिंपरी चिंचवड येथील पिंपळे निलख येथील राहणारे होते. पुण्यात राहणाऱ्या आनंद सुभाष साळगावकर यांनी या ट्रेकचे आयोजन केले होते.
साळगावकर हे वकील व्यवसाय करतात. त्यांना गड आणि किल्ले फिरण्याचा छंद आहे. त्यांनी रमेश पाटील यांच्यासह दिनेश बोडके, मंजीत चव्हाण, प्रवीण पवार, संदीप लोहकर, सुनील गुरव व इतर तीन जणांनी मिळून पुणे ते भीमाशंकर असे २५ किलोमीटरचे पाई ट्रेकिंग आयोजित केले होते. रविवारी दि.१६ रोजी सकाळी पहाटे पावणे सात वाजता मावळ तालुक्यातील मालेगाव बुद्रुक येथून त्यांनी पायी चालायला सुरुवात केली. पायी चालत भीमाशंकर कडे येत असताना गुप्त भीमाशंकर येथे दुपारी अडीच वाजता खेड तालुक्याच्या हद्दीत रमेश पाटील हे अचानक चक्कर येऊन खाली पडले. यावेळी सर्वांनी त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांची काही हालचाल होत नव्हती व श्वास बंद पडला होता. त्यांना तोंडाने ही कृत्रिम श्वासोश्वास देण्याचा प्रयत्न सर्वांनी केला. परंतु काही फरक पडला नाही.
त्यानंतर 108 रुग्णवाहिकेला कॉल दिला. मात्रही तळेघर येथील १०८ रुग्णवाहीका दुसर्या काॅलवर असल्यामुळे त्यांच्या कडून लवकर प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून सर्वांनी उचलून रमेश पाटील यांना भीमाशंकर मंदिराजवळ आणले. श्री भीमाशंकर येथील रुग्णालयामध्ये आणण्यात आले परंतु तो बंद असल्यामुळे घटनेची माहिती घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ त्यांना निम्म्या रस्त्यामध्ये पोलिस वाहनातुन व नंतर १०८ रुग्णवाहिकेतुन तळेघर येथे प्राथमिक अरोग्य केंद्रामध्ये हलविण्यात आले. मात्र व्यक्तीकडून कोणत्याही प्रसाद मिळत नसून त्यांना पुढे घोडेगाव येथे हलवा असे येथील डॉक्टरानी सांगितले. तेथून १०८ च्या रुग्णवाहिकेने घोडेगाव येथे ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केली असता रमेश पाटील यांना मृत घोषित केले. सर्वांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले मात्र. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
रविवारी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी व मुसळधार पाऊस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती परंतु घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी पोलीस वाहनाचे सायरन वाजवत व आनंद सिंग करत पोलीस वाहन हे कसेबसे तळेघर पर्यंत पोहोचवले.१०८रुग्णवाहीकेचे डॉक्टर दादासाहेब गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही.