भीमसेनी सुरांनी मराठी-कानडीला एकसंध केले; शरद पवार यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 03:22 AM2021-02-07T03:22:16+5:302021-02-07T03:22:38+5:30
भारतरत्न भीमसेन जोशी जन्मशताब्दी सोहळा
पुणे : “राजकीय क्षेत्रात काम करताना मराठी आणि कानडी अशा वादात अडकवले जाते. पण हे अंतर न ठेवता संगीताच्या माध्यमातून मराठी आणि कानडीला एकसंध करण्याची कामगिरी पंडित भीमसेन जोशी यांनी करून दाखविली. पंडितजींनी कायमच संगीताच्या माध्यमातून समाजाची
सेवा केली. यापुढील काळात पंडितजींचे सूर चिरकालीन कसे राहतील याचा विचार झाला पाहिजे,” अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी ४ फेब्रुवारीपासून सुरू झाली. त्या निमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित ‘अभिवादन’ या सांगितिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी पवार बोलत होते. यावेळी सुलेखनकार अच्युत पालव यांनी डिझाईन केलेल्या विशेष ‘मोनोग्राम’चे अनावरण यावेळी करण्यात आले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, भारतीय सांस्कृतिक
संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, पंडितजींचे पुत्र व मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यावेळी उपस्थित होते.
पवार यांनी पंडितजींच्या आठवणींना उजाळा दिला. पंडितजींनी सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या माध्यमातून नवीन कलाकारांना नेहमीच प्रोत्साहित केले. ती परंपरा आजही कायम असल्याचा आनंद वाटतो, असे पवार म्हणाले. जोवर संगीतप्रेमी आहेत तोवर पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर या दोन भारतरत्नांचे नाव कायमच घेतले जाईल. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी पंडितजींची मैफल ऐकण्याची संधी काही वेळा मिळाली. तसेच एकदा आमच्या निवासस्थानी देखील हा योग जुळून आला होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ओलावा कायमच जाणवत असेही पवार म्हणाले.
पं. उपेंद्र भट यांच्या गायनाने मैफलीची सुरुवात
जावडेकर म्हणाले की, पंडितजी म्हणजे संगीतातील अखेरचा शब्द. आकाशवाणीचे राष्ट्रीय स्तरावरील संगीत संमेलन या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने यापुढे ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत संमेलन’ म्हणून ओळखले जाईल.
कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर पंडितजींचे ज्येष्ठ शिष्य पं. उपेंद्र भट यांच्या गायनाने पहिल्या सत्रातील सांगितिक मैफलीची सुरुवात झाली.