महाभारत घडण्यास भीष्म कारणीभूत - डॉ. सदानंद मोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 02:33 AM2018-07-14T02:33:23+5:302018-07-14T02:33:53+5:30
‘महाभारत घडण्यास भीष्म कारणीभूत आहेत. त्यांना वेळोवेळी निर्णायक भूमिका घेण्याची संधी मिळाली होती. त्यांनी ज्येष्ठतेचा लाभ घेत निर्णय घेणे अपेक्षित होते; परंतु निर्णायक भूमिका घेण्यात केलेल्या कुचराईमुळे अनेक युद्धे झाली.
पुणे : ‘महाभारत घडण्यास भीष्म कारणीभूत आहेत. त्यांना वेळोवेळी निर्णायक भूमिका घेण्याची संधी मिळाली होती. त्यांनी ज्येष्ठतेचा लाभ घेत निर्णय घेणे अपेक्षित होते; परंतु निर्णायक भूमिका घेण्यात केलेल्या कुचराईमुळे अनेक युद्धे झाली. चुकीच्या निर्णयामुळे इतिहासाला कशी चुकीची दिशा मिळू शकते, याचे महाभारत आणि भीष्म उत्तम प्रतीक आहे. भीष्म हे महाभारताचे सक्रिय साक्षीदार होते. त्यांनी घेतलेल्या अतार्किक भूमिकेमुळे महाभारत घडले, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे लेखक रवींद्र शोभणे यांच्या महाभारत कथांवर आधारित ‘उत्तरायण’ या कादंबरीचे प्रकाशन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, लेखक भारत सासणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, रवींद्र शोभणे, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसचे अशोक कोठावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
भारत सासणे आणि प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘उत्तरायण’ या कादंबरीवर भाष्य केले. मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसचे अशोक कोठावळे यांनी प्रास्ताविक केले. सायली लाखे-पिदळी यांनी सूत्रसंचालन केले.
साहित्यकृती अस्मितेचा विषय
कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘आपण महाभारत किंवा रामायणासारख्या कलाकृतींकडे इतिहास म्हणून पाहतो. त्यामुळे लगेच हे साहित्य एका समाजाचे प्रतिनिधित्व करायला लागते आणि त्यामुळे ती साहित्यकृती त्यांच्या अस्मितेचा विषय होऊन जातो. परंतु, जागतिक पातळीवर या कलाकृतीला महाकाव्य या दृष्टिकोनातून पाहिले जात असेल, तर भारतीयांनी त्याही दृष्टिकोनाचा आदर केला पाहिजे. या महाकाव्यांवर आधारित पौराणिक नाटके पारंपरिक दृष्टिकोनावर आधारित होती. या महाकव्यांचा विश्लेषणात्मक मूल्यांतून अभ्यास होणे अपेक्षित होते. लोकचळवळी बळावल्या तसा महाभारतातील कर्ण या पात्रास केवळ महाभारतातील पात्र म्हणून महत्त्व न राहता तो समाजातील उपेक्षित वर्गाचा प्रतिनिधी म्हणूनही पुढे येऊ लागला.’’