बिबटे निघाले पुण्याहून बारामती, इंदापूरकडे...

By admin | Published: January 15, 2017 05:27 AM2017-01-15T05:27:56+5:302017-01-15T05:27:56+5:30

खेड, जुन्नर, आंबेगावमध्ये ऊसाचे क्षेत्र पुरेसे नसल्याने बिबटे दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यात स्थलांतरीत होऊ लागले आहेत. या भागाकडे जाता वाटेत पुणे शहर असल्याने येथील

Bhiwate left from Pune to Baramati, Indapur ... | बिबटे निघाले पुण्याहून बारामती, इंदापूरकडे...

बिबटे निघाले पुण्याहून बारामती, इंदापूरकडे...

Next

- सुषमा नेहरकर-शिंदे,  पुणे

खेड, जुन्नर, आंबेगावमध्ये ऊसाचे क्षेत्र पुरेसे नसल्याने बिबटे दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यात स्थलांतरीत होऊ लागले आहेत. या भागाकडे जाता वाटेत पुणे शहर असल्याने येथील गर्दीत बिबटे भरकटत असल्याचे वनविभागाच्या वतीने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्या सापडला होता. शुक्रवारी पिरंगुट परिसरातही बिबटे दिसले. हे बिबटे उत्तर पुणे जिल्ह्यातून पूर्व भागाकडे जाताना पुण्यात भरकटत आहेत. अन्न पाण्याच्या शोधात अन्य तालुक्यांकडे स्थलांतर सुरू केले आहे. वन विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या विशेष पाहणीमध्ये बिबट्याचे जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातून दौंड, बारामती आणि इंदापूर या उसाचे क्षेत्र व मुबलक खाद्य असलेल्या तालुक्याकडे स्थलांतर होत असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत प्रामुख्याने जुन्नर, खेड, आंबेगाव या तीन तालुक्यांमध्ये प्रामुख्याने बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात होता. अनेक बिबटेदेखील पकडण्यात आले. बिबट्याची संख्या वाढत असल्याचे लक्षात आल्याने शासनाच्या वतीने जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे स्वंतत्र बिबट्या निवारण केंद्र सुरू करण्यात आले. सध्या माणिकडोह येथे ३५ पेक्षा अधिक बिबटे पकडून ठेवण्यात आले आहे.
जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातील उसाचे क्षेत्र हे राहण्याचे मुख्य शेल्टर असून, पाणी व पाळीव कोंबड्या, भटकी कुत्रीही या बिबट्यांचे मुख्य खाद्य आहे. बिबट्यांचे खाद्य कमी झाल्याने त्यांनी स्थलांतर सुरू केले आहे.
पुणे जिल्ह्याचे उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांनी सांगितले, की बिबट्या हा प्राणी कॅट फॅमिलीत येत असून, उसाचे क्षेत्र हे त्याचे राहण्याचे प्रमुख शेल्टर आहे.
उसाच्या क्षेत्रात वास्तव्य केल्यावर पिण्याचे पाणी व खाद्य मिळविणे बिबट्यांना सहज शक्य होते. परंतु गेल्या काही दिवसांत या तालुक्यामधील उसाचे क्षेत्र कमी होत असून, बिबट्यांना खाद्य मिळण्यासाठीदेखील अडचण येत आहे. यामुळेच बिबट्याचे जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यातून दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यांकडे प्रवास सुरु आहे.
सध्या बिबट्यांचा स्थलांतराचा प्रवास सुरू असल्यानेच पुण्याच्या हद्दीलगत कोंढवा, पौंड, खडकवासला परिसरात बिबट्या दिसत असल्याचे निदर्शनास आले आहे.

चाकणला बिबट्या सफारी
माणिकडोह येथील बिबट्या पुनर्वसन केंद्रात जागेचा अभाव असल्याने जिल्ह्यात गुजरात येथील गीर अभयारण्यातील ‘सिंह सफारी’सारखी बिबट्याची सफारी सुरू करण्याचा विचार सुरू आहे. यासाठी चाकण किंवा परिसरात सुमारे दोन ते अडीच हेक्टर जागा शोधण्याचे काम सुरू आहे, असे उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांनी सांगितले.

Web Title: Bhiwate left from Pune to Baramati, Indapur ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.