भोर काँग्रेसचा बालेकिल्ला; मागील ३ निवडणुकीत काँग्रेसचा आमदार, यंदा चित्र बदलण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 03:24 PM2024-10-16T15:24:08+5:302024-10-16T15:24:19+5:30

भोर विधानसभा मतदारसंघात भोर, वेल्हे, मुळशी तीन तालुके येत असून २००९ पासून सलग ३ निवडणुका संग्राम थोपटे यांनी जिंकून हॅट्ट्रिक केली

Bhor Congress stronghold; Congress MLA in the last 3 elections, the picture is likely to change this year | भोर काँग्रेसचा बालेकिल्ला; मागील ३ निवडणुकीत काँग्रेसचा आमदार, यंदा चित्र बदलण्याची शक्यता

भोर काँग्रेसचा बालेकिल्ला; मागील ३ निवडणुकीत काँग्रेसचा आमदार, यंदा चित्र बदलण्याची शक्यता

पुणे : भोरविधानसभा मतदारसंघात औद्योगिक वसाहतीचा कळीचा मुद्दा, पर्यटन दृष्टीने रखडलेला विकास आणि वाढलेले नवीन मतदार यातच भर म्हणून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात सरळ लढत झाल्यास आमदार संग्राम थोपटेंना काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात झगडावे लागेल असेच चित्र भोर मतदारसंघात सध्या तरी पाहावयास मिळत आहे.

भौगोलिकदृष्ट्या भोर विधानसभा मतदारसंघ सर्वांत लांब आणि अत्यंत किचकट आहे. ४ लाख १२ हजार ४१४ मतदार आहेत. त्यात स्त्री १ लाख ९३ हजार ०७९, पुरुष- २ लाख १९ हजार ३३१ तर तृतीयपंथी ४, अपंग -५ हजार ३८२ अशी संख्या आहे. भोर तालुक्यापेक्षा मुळशीत ३५ ते ४० हजार मतदार वाढले आहेत.

भोर विधानसभा काँग्रेसचा पारंपरिक आणि हक्काचा मतदारसंघ आहे. १९८० व १९९९ वगळता ४५ वर्षांपासून हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. भोर विधानसभा मतदारसंघात भोर, वेल्हे, मुळशी तीन तालुके येत असून २००९ पासून सलग तीन निवडणुका आमदार संग्राम थोपटे यांनी जिंकून हॅट्ट्रिक केली आहे; मात्र असे असले तरी दरवेळी मताधिक्य कमी होत गेले आहे. सध्या महाविकास आघाडीकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून चौकार मारण्यासाठी सज्ज झाले आहेत.

भोर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून माजी नगरसेवक किरण दगडे-पाटील, राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, शिवसेना ठाकरे गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, शिवसेना शिंदे गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, माजी सभापती बाळासाहेब चांदेरे इच्छुक आहेत. आमदार संग्राम थोपटे यांच्यासह सर्वांनीच मोठमोठे कार्यक्रम घेतले. त्यामध्ये शक्ती प्रदर्शनही केले आहे; मात्र महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

रोजगाराचा प्रश्न गाजणार

तालुक्यात बंद पडलेली कारखानदारी तर औद्योगिक वसाहतीचे मागील ३२ वर्षांपासून भिजत घोंगडे,अपूर्ण कालवे उपसा जल, सिंचन योजना,पर्यटन दृष्टीने रखडलेला विकास यामुळे सुशिक्षित तरुण बेरोजगार झाले असून आपली गावे सोडून नोकरी कामधंद्यासाठी बाहेरगावी जात आहे. यामुळे ४० टक्के वयोवृद्ध नागरिक गावात दिसत आहेत. याचा फटका काही प्रमाणात आमदार संग्राम थोपटे यांना निवडणुकीत बसेल अशी चर्चाही सुरू झाली आहे. दुसरीकडे महायुतीकडून आमदार थोपटेंच्या विरोधात एकच उमेदवार कसा राहिल याच्यासाठी वाटाघाटी सुरू झालेल्या आहेत. जर महायुतीचा एकच उमेदवार राहिला तर आमदार थोपटेंना बालेकिल्ल्यातच झगडावे लागेल.

Web Title: Bhor Congress stronghold; Congress MLA in the last 3 elections, the picture is likely to change this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.