भोर नगरपालिकेला दोन महिन्यांपासून मुख्याधिकारी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:12 AM2021-08-15T04:12:28+5:302021-08-15T04:12:28+5:30
भोर : भोर नगरपालिकेला मागील दोन महिन्यांपासून मुख्याधिकारी नाही, त्यामुळे शहरातील गटार साफसफाई, गवत काढणे यांसह अनेक प्रकारची ...
भोर : भोर नगरपालिकेला मागील दोन महिन्यांपासून मुख्याधिकारी नाही, त्यामुळे शहरातील गटार साफसफाई, गवत काढणे यांसह अनेक प्रकारची कामे रखडली आहेत. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असून नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
भोरचे मुख्याधिकारी विजय थोरात यांची बदली होऊन दोन महिने झाले; मात्र अद्याप नवीन मुख्याधिकारी आलेले नसल्यामुळे शहरातील पावसाळ्यापूर्वी करायची कामे झाली नाही. जागोजागी गवत वाढले असून गटारांची साफसफाई अजूनही झालेली नाही. कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही, अशा परिस्थिती शहराचे नियोजन कोण करणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा आहे. नगरपालिकेत इतर कर्मचाऱ्यांची उपस्थितीसुद्धा दुर्मिळ झाली आहे. त्यामुळे आपली व्यथा सांगायची कोणाला, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
भोर शहरात गवत उगवलेले असून खड्ड्यात पाणी साचत आहे. यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे शहरात रोगराई वाढण्याची भीती असून शहरात सर्वत्र डीडीटी पावडर फवारण्याची मागणी भोर शहर शिवसेनाप्रमुख नितीन सोनावले यानी केली आहे.
---
चौकट -१
चौकट स्वच्छ, सुंदर भोर शहराचा फज्जा
भोर शहराला स्वच्छ, सुदर भोर शहरासाठी पुरस्कार मिळाला होता. मात्र, आता भोर शहरात अनेक ठिकाणी कचरा साचला आहे. मैदाने, रस्त्याच्या दुतर्फा गवत उगवलेले आहे. त्यामध्ये मोकाट जनावरे लोळत आसतात. त्यात पाऊस पडला की तेथे दलदल होते व त्याची दुर्गंधी परिसरातील नागरिकांना हैराण करते. अनेक महिन्यांपासून गटारी साफ केल्या नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. याकडे भोर नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे स्वच्छ, सुंदर भोर शहराचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
--