भोर पोलिसांचा ज्येष्ठांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:11 AM2021-05-24T04:11:19+5:302021-05-24T04:11:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क महुडे : एकीकडे कोरोनामुळे लॉकडॉऊन सुरू असून यामुळे सर्व व्यवहार बंद आहे. अशा स्थितीत निराधार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
महुडे : एकीकडे कोरोनामुळे लॉकडॉऊन सुरू असून यामुळे सर्व व्यवहार बंद आहे. अशा स्थितीत निराधार तसेच वृद्ध नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांची ही होणारी अडचण बघता भोर पोलिसांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. अशा ज्येष्ठांच्या घरी जाऊन त्यांना आैषधोपचार देण्यासोबतच त्यांची देखभाल केली जात आहे.
कोरोनाची महाभयंकर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे निराधार वृद्ध नागरिकांची गैरसोय होत आहे. पैसे असतानाही वय झाल्यामुळे त्यांना घराबाहेर पडता येत नसल्याने तसेच आैषधे तसेच दैनंदिन वस्तू आणता येत असल्याने अशा निराधार ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहे. त्यांची ही अडचण तसेच होणारी गैरसोय बघता भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी अशा ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात पुढे करून एक वेगळा उपक्रम सुरू केला आहे.
ज्येष्ठ नागरिकांना गुडघेदुखी, हृदयविकार, किडनीचे आजार, रक्तदाब असे आजार असल्याने त्यांना घराबाहेर जाता येत नाही. त्यामध्ये लॉकडाऊन, घरात पैसे असूनही त्यांचा उपयोग होत नाही. तर काही घरांमध्ये वृद्ध नवरा-बायको आहेत, मुले नाहीत त्यांना आधार देण्याचे काम भोर पोलीस करत आहे. या ज्येष्ठ नागरिकांना भाजीपाला किराणा, दुकानातील साहित्य, वीजबिल भरणे यांसारखी कामे होमगार्डच्या मदतीने काही पोलीस कर्मचाऱ्यांचा मोबाईल नंबर त्यांना देण्यात आले आहेत. घरी होमगार्ड आल्यानंतर व जेष्ठ नागरिकांचे काम केल्यानंतर नोंदवहीत सही केली जात आहे.
मागील आठवड्यात जेष्ठ नागरिक संघाची भोरचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम, अप्पा हेगडे यांनी बैठक बोलावून कोरोना लॉकडाऊन काळात ज्येष्ठांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यावर ज्येष्ठांच्या मदतीला पोलीसांनी अशी संकल्पना सुरु केली. या बैठकीस ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी.जी सावंत, सदाशिव अंबिके, रमेश आडकर, विठ्ठल टिळेकर आदी ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्य उपस्थित होते.
फोटो - ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ऐकून घेताना पो. नि. प्रवीण मोरे.
(छाया.स्वप्नीलकुमार पैलवान )