भोर तालुकाही १०० टक्के निर्मल
By admin | Published: October 4, 2016 01:35 AM2016-10-04T01:35:29+5:302016-10-04T01:35:29+5:30
मुळशीनंतर भोर तालुक्याने १०० टक्के शौैचालये बांधून निर्मल तालुका होण्याचा बहुमान मिळविला आहे. गेल्या चार महिन्यांत १ हजार ७६४ कुटुंबांनी शौैचालये बांधून तालुक्याला हा बहुमान मिळवून दिला
भोर : मुळशीनंतर भोर तालुक्याने १०० टक्के शौैचालये बांधून निर्मल तालुका होण्याचा बहुमान मिळविला आहे. गेल्या चार महिन्यांत १ हजार ७६४ कुटुंबांनी शौैचालये बांधून तालुक्याला हा बहुमान मिळवून दिला.
शासनाने या वर्षी १० जिल्हे हगणदरीमुक्त करण्याचे ठरविले असून त्यात पुणे जिल्हाही आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने त्या दृष्टीने काम सुरू केले असून, गेल्या चार महिन्यांत वेगाने काम सुरू आहे. ३० स्पटेंबरपर्यंतच हे टार्गेट पूर्ण करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने ठरविले आहे. भोर व वेल्हे हे दोन तालुके १५ आॅगस्टला निर्मल जाहीर करण्याचे ठरविले होते. मात्र, पावसाने व्यत्यय आणल्याने हे काम थोडेसे रंगाळले. अखेर भोर तालुका निर्मल झाला आहे. तालुक्यात १५५ ग्रामपंचायती व १९६ गावे असून सन २०१६-१७ वर्षांसाठी १,७६४ कुटुंबांना डिसेंबरअखेरपर्यंत शौचालये बांधण्याचे उदिष्ट देण्यात आले होते. तालुक्यात एकूण ३१ हजार २५७ कुटुंबांकडे ३१ हजार २५७ शौचालये पूर्ण झाली आहेत, असे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजीव गायकवाड यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत उपक्रमांर्तगत तालुक्यात १५५ ग्रामपंचायतींमधील ३१ हजार ३०० कुटुंबांपैकी २६ हजार ९६४ कुटुंबांनी शौचालये बांधली होती.
भोर तालुका निर्मल करण्यासाठी प्रत्येक गावाला संर्पक अधिकारी नेमण्यात आला होता. गावपतळीवर ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक अधिकारी व कार्यालयीन कर्मचारीही निर्मलग्रामसाठी बाहेर पडून काम करीत होते. सर्व जण लोकांच्या घरोघरी जाऊन प्रबोधन करून लोकांना महत्त्व सांगत होते. कला पथकांंमार्फत व बॅनर पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. (वार्ताहर)