भोसरी, आकुर्डीतील वीजग्राहकांना दिलासा; तब्बल ८ तासानंतर वीजपुरवठा झाला सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 05:31 PM2022-03-23T17:31:51+5:302022-03-23T17:42:58+5:30

पुणे : महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रातील १०० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बुधवारी (दि. २३) सकाळी ...

bhosari akurdi Power supply was restored after 8 hours pune latest news | भोसरी, आकुर्डीतील वीजग्राहकांना दिलासा; तब्बल ८ तासानंतर वीजपुरवठा झाला सुरळीत

भोसरी, आकुर्डीतील वीजग्राहकांना दिलासा; तब्बल ८ तासानंतर वीजपुरवठा झाला सुरळीत

googlenewsNext

पुणे : महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रातील १०० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बुधवारी (दि. २३) सकाळी ६ वाजता पुर्णतः नादुरुस्त झाल्यामुळे भोसरी व आकुर्डी परिसरातील महावितरणच्या सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला होता (bhosari akurdi power cut off). मात्र विविध ठिकाणच्या उपकेंद्रांतून सुमारे ५० मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करून महावितरणकडून दुपारी २ वाजेपर्यंत सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. (cut off electricity power in bhosari akurdi restored)

दरम्यान, महापारेषणकडून नादुरुस्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम सुरु करण्यात आले असून येत्या शनिवार (दि. २६) पर्यंत ते पूर्ण होईल. तोपर्यंत भोसरी व आकुर्डी परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा २४ तास सुरु ठेवण्यात येणार आहे. तर विजेच्या वाढत्या मागणीमुळे नाईलाजाने भोसरी एमआयडीसीमधील सुमारे ७५०० औद्योगिक ग्राहकांना चक्राकार पद्धतीने १२ तास वीजपुरवठा करण्यात येत आहे. 

भोसरीमधील महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रामध्ये १०० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बुधवारी सकाळी ६ वाजता बिघाड झाला. त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरवरील १० वीजवाहिन्यांची वीज खंडित झाली व भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर तसेच नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील ४५०० औद्योगिक ग्राहकांसह सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. दुपारी १२ वाजता ट्रान्सफॉर्मर पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आल्याने महापारेषणकडून तो बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम येत्या शनिवारपर्यंत पूर्णत्वास जाईल. तोपर्यंत प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक ग्राहकांना पर्यायी व्यवस्थेतून २४ तास वीजपुरवठा करण्याचे नियोजन महावितरणने तयार केले. 

त्याप्रमाणे महापारेषणच्या उपकेंद्रामधील दुसऱ्या ७५ एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरवरून सुमारे २६ वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्याचे आव्हान होते. त्यावर यशस्वी उपाययोजनांनी मात करीत दुपारी २.३० वाजेपर्यंत पर्यायी व्यवस्थेतून भोसरी व आकुर्डी परिसरातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला. यामध्ये ७५ एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरवरील ११ वीजवाहिन्यांचा भार अन्य उपकेंद्रांवर वळविण्यात आला. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरवरील वीजभार कमी झाला. तर उर्वरित १५ वीजवाहिन्यांपैकी प्रामुख्याने घरगुती व वाणिज्यिक व इतर वीजग्राहक तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या एक्सप्रेस वीजवाहिनीसह एकूण ८ वीजवाहिन्यांना २४ तास वीजपुरवठा करण्यासाठी तांत्रिक उपाययोजना करण्यात आली. याच ट्रान्सफॉर्मरवरून औद्योगिक ग्राहकांच्या ७ पैकी ४ वीजवाहिन्यांवरील वीजपुरवठा देखील सुरळीत झाला. 

मात्र भारव्यवस्थापन शक्य नसल्याने उरलेल्या तीन वीजवाहिन्यांवरील भोसरी एमआयडीसीमधील सुमारे ७५०० औद्योगिक ग्राहकांना नाईलाजाने चक्राकार पद्धतीने १२ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा लागत आहे. याबाबत संबंधित औद्योगिक ग्राहक व संघटना पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. महापारेषणकडून नादुरुस्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम पूर्ण होताच या औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत होणार आहे. 

Web Title: bhosari akurdi Power supply was restored after 8 hours pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.