भोसरी पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात गुन्हेगारांकडून २४ पिस्तूल, ३८ काडतुसे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 05:08 PM2021-01-27T17:08:48+5:302021-01-27T17:09:17+5:30
टोळीचा पर्दाफाश; आरोपींनी पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी पिस्तूल पुरवठा केल्याचे तपासात निष्पन्न
पिंपरी : मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून शहरात त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. यात १२ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून २४ पिस्तूल व ३८ जिवंत काडतुसे जप्त केली. भोसरीपोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.
बबलूसिंग उर्फ राॅनी अत्तरसिंग बरनाला (रा. उमर्टी, पो. बलवाडी, ता. वरला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) कालू उर्फ सुशील मांगीलाल पावरा (रा. अंमलवाडी, ता. चोपडा, जि. जळगाव, मूळ रा. बडवाणी, मध्यप्रदेश), रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील (रा. भोसरी, मूळ रा. धुळे) उमेश अरून रायरीकर (रा. गायकवाड वाडी, बहुली, ता. हवेली), बंटी उर्फ अक्षय राजू शेळके (रा. मुंढवा, पुणे), धिरज अनिल ढिगारे (रा. हडपसर, पुणे), दत्ता उर्फ महाराज सोनबा मरगळे (रा. पेरणे फाटा, मूळ रा. चीलोबा वस्ती, मलठण, ता. दौंड), माॅन्टी संजय बोथ उर्फ माॅन्टी वाल्मीकी (रा. नेहरू नगर, पिंपरी), अमित बाळासाहेब दगडे (रा. बावधन), राहूल गुलाब वाल्हेकर (रा. भोर), संदीप आनंता भुंडे (रा. बावधन), असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिसांच्या तपास पथकाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आरोपी रुपेश पाटील याला अटक केली. त्याच्याकडून चार पिस्तूल व चार काडतुसे जप्त केली. आरोपीने ते पिस्तूल मध्यप्रदेशातून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात रवाना झाले. तेथील बडवाणी जिल्ह्यातील वरला तालुक्यातील बलवाडी, उमर्टी गावाजवळ जंगलात सापळा रचून पाठलाग करून पिस्तुलाचा मुख्य डिलर आरोपी रॉनी बरनाला याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आठ पिस्तूल व २० जिवंत काडतुसे जप्त केली. त्यानंतर रॉनीचा मध्यप्रदेशातील साथीदार कालू पावरा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन पिस्तूल व पाच काडतुसे जप्त केली. आरोपींनी पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी पिस्तूल पुरवठा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी इतर आरोपींनाही अटक केली.
भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे, निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, सहायक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, समीर रासकर, गणेश सावंत, सुमीत देवकर, विनोद वीर, संतोष महाडीक, आशिष गोपी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
सोशल मीडियाचा वापर; शस्त्रांचा मध्यप्रदेशातून पुरवठा
आरोपी शस्त्रांचा मध्यप्रदेशातून पुरवठा करीत असत. त्यासाठी आरोपी राॅनी व कालू हे सोशल मीडियाव्दारे आरोपींना त्यांचा संपर्क क्रमांक देत असत. तसेच अनेक सराईत गुन्हेगार येरवडा जेलमध्ये असताना आरोपी राॅनी व कालू यांचा संपर्क क्रमांक एकमेकांना देत असत. ‘मुळशी पॅटर्न’नुसार गुन्हे करणारा आरोपी नन्या रायरीकर तसेच राहुल वाल्हेकर, अमित दगडे, धिरज ढिगारे, बंटी शेळके यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून २४ पिस्तूल व ३८ जिवंत काडतुसे असा एकूण ११ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी राॅनी व कालू यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.