महावितरणमुळे भोसरीकर घामाघूम
By admin | Published: May 27, 2017 01:06 AM2017-05-27T01:06:32+5:302017-05-27T01:06:32+5:30
गेल्या आठवडाभरात भोसरी एमआयडीसी आणि भोसरी गावठाण परिसरातील नागरिक व उद्योजक महावितरणच्या अनियमित विद्युतपुरवठ्यामुळे त्रस्त झाले असून
लोकमत न्यूज नेटवर्क
भोसरी : गेल्या आठवडाभरात भोसरी एमआयडीसी आणि भोसरी गावठाण परिसरातील नागरिक व उद्योजक महावितरणच्या अनियमित विद्युतपुरवठ्यामुळे त्रस्त झाले असून, ऐन उन्हाळ्यात दिवसातून २ ते ३ तास वीज गायब असल्याने
उन्हाच्या कडाक्याने भोसरीकर घामाघूम झाले आहेत. एकीकडे अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आधीच घशाला कोरड पडलेल्या शहरवासीयांना आता विजेच्या लपंडावालाही तोंड द्यावे लागत असल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
भोसरी औद्योगिक परिसरात हजारो छोटे मोठे उद्योजक व्यवसाय करतात. दर गुरुवारी सार्वजनिक सुटी असल्याने या काळात महावितरणची दुरुस्तीची कामे केली जातात तरीही इतर दिवशी सर्रासपणे वीज खंडित होत असल्याने उद्योजकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे लघुउद्योजकांत तीव्र नाराजी आहे. भोसरी गावठाण भागातही छोटे मोठे व्यावसायिक व्यवसाय करतात. विजेशिवाय व्यवसाय करणे खर्चिक ठरत असून, मे महिन्याच्या उन्हाळ्यात वीज खंडित झाल्याने नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत.
उद्योजकांना आर्थिक भुर्दंड
उद्योगांना अनियमित वीजपुरवठा होत असल्याने उद्योजकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, महावितरणचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. परिणामी विजेच्या लपंडावामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याने उद्योजक नाराज आहेत. वारंवार खंडित होणाऱ्या वीजप्रवाहामुळे उद्योजकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
दुरुस्तीची कामे ‘जैसे थे’
भोसरी परिसरातील ओव्हरहेड तारा जुन्या झाल्याने वारंवार तुटत असल्याने मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होते. कमी उंचीच्या वायरमुळे अधिक उंचीच्या मालवाहतूक वाहनांना शॉक लागून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. सर्व ओव्हरहेड वायर काढून भूमिगत कराव्यात, अशी मागणी कित्येक महिन्यांपासून उद्योजक करीत आहेत. कुदळवाडी, चिखली, मोरे वस्ती, भोसरीतील सेक्टर ७, १०, जे ब्लॉक, गट क्रमांक ७१० येथे वारंवार वीज जाते. वीजमीटरसंबंधीसुद्धा उद्योजकांच्या तक्रारी असून, त्याकडेही महावितरणचे अधिकारी लक्ष देत नाहीत.