बीएचआर पतसंस्था आर्थिक घोटाळा प्रकरण: जितेंद्र कंडारेच्या अटकेने मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 09:44 PM2021-06-29T21:44:53+5:302021-06-29T21:46:38+5:30

जळगाव व इतर काही शहरात आर्थिक गुन्हे शाखेने एका पाठोपाठ छापे घालून या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना अटक केली आहे.

BHR Bank Fraud Case: Jitendra Kandare's was arrested by pune police from indurin | बीएचआर पतसंस्था आर्थिक घोटाळा प्रकरण: जितेंद्र कंडारेच्या अटकेने मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

बीएचआर पतसंस्था आर्थिक घोटाळा प्रकरण: जितेंद्र कंडारेच्या अटकेने मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

Next

पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार जितेंद्र कंडारे याला पुणेपोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने इंदूर येथून ताब्यात घेतले आहे. कंडारे याच्याकडे एक डायरी सापडली असून त्यात अनेकांची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे. कंडारे यांच्या अटकेने याप्रकरणात आणखी कोणा कोणाचा सहभाग आहे, याचा खुलासा होण्याची शक्यता असून आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इंदूर येथे सोमवारी रात्री एका वसतीगृहात वास्तव्याला असलेल्या जितेंद्र कंडारे याला पुणे पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला आज इंदूर येथील न्यायालयात हजर करुन पुण्याला आणण्यासाठी ट्रॉझिंट वॉरंट घेण्यात आले. त्यानंतर हे पथक त्याला घेऊन पुण्याकडे निघाले असून बुधवारी सकाळी पुण्यात येईल. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

जळगाव व इतर काही शहरात आर्थिक गुन्हे शाखेने एका पाठोपाठ छापे घालून या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना अटक केली आहे. अवसायक जितेंद्र कंडारे हा गेल्या ७ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. तरीही पोलिसांनी त्याचा माग घेणे सोडले नव्हते. कंडारे हा मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका वसतीगृहात वास्तव्य करुन रहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याबरोबर पुण्यातून एक पथक तातडीने इंदूरला रवाना झाले. त्यांनी सोमवारी रात्री उशिरा कंडारे याला हॉटेलमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडील तपासातून या संपूर्ण आर्थिक घोटाळ्याचे सुत्र पुढे येण्यास मदत होणार आहे. ... ३५ हजार ठेवीदार आणि ८०० कोटींचा घोटाळा बीएचआर पतसंस्थेचे महाराष्ट्रासह इतर राज्यात मिळून ३५ हजारांहून अधिक ठेवीदार आहेत. या आर्थिक घोटाळ्याच्या पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये आतापर्यंत ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणामध्ये ६५० हून अधिक लोक गुंतवले असून कंडारे याला अटक केल्यामुळे यामागील सुत्र आता अधिक स्पष्टपणे पुढे येणार आहे.

....

जेवणासाठी आला अन पोलिसांच्या जाळ्यात सापडला या प्रकरणातील मुख्य सुत्रधार जितेंद्र कंडारे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. तो मध्य प्रदेशासह अन्य दोन ते तीन राज्यांमध्ये सातत्याने फिरत होता. गेल्या काही दिवसांपासून तो इंदूरमधील एका वसतीगृहामध्ये आपली ओळख लपवून रहात होता. तो संपूर्ण वेळ खोलीत रहात असे. पुणे पोलिसांना त्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या वसतीगृहावर पाळत ठेवली होती. सोमवारी रात्री तो जेवणासाठी खाली आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

....

बीएचआर आर्थिक घोटाळा प्रकरणात जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर हे दोघे मुख्य सुत्रधार आहेत. त्यापैकी झंवर हा अजूनही फरार आहे. जितेंद्र कंडारे याला सोमवारी रात्री इंदूरमधून अटक करण्यात आली आहे. त्याला पुण्यात आणून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे

Web Title: BHR Bank Fraud Case: Jitendra Kandare's was arrested by pune police from indurin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.