भूगावची सुवर्णकन्या आयुषा इंगवलेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:11 AM2021-02-27T04:11:23+5:302021-02-27T04:11:23+5:30
जळगाव येथे झालेल्या आठव्या वरिष्ठ राज्य सॉफ्टटेनिस स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातल्याने आयुषा इंगवलेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १६ ...
जळगाव येथे झालेल्या आठव्या वरिष्ठ राज्य सॉफ्टटेनिस स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातल्याने आयुषा इंगवलेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१६ वर्षांच्या आयुषाने वरिष्ठ गटात मुलींच्या एकेरीत यजमान जळगाव, यजमान उस्मानाबाद व पुणे संघाच्या अव्वल खेळाडूंवर मात करून आयुषाने विजेतेपद पटकावले. पहिल्या फेरीत जळगावच्या वैष्णवी देशमुखला २-० दुस-या फेरीत अस्मानाबादच्या प्रेरणा देशमुखला २-० उपांत्यफेरीत जळगावच्या पौर्णिमा चव्हाणला २-१ने तर अंतिम फेरीत पुण्याच्या ययाती दांदडेवर ३-० या सेटच्या फरकाने मात करून आयुषाने स्पर्धेतील आपली एकतर्फी विजयाची परंपरा कायम राखली. सलग चार विजयाची नोंद करून तिने पुण्याला सुवर्णपदक जिंकून दिले.
जम्मू-काश्मीरमध्ये येथे ४ ते ८ मार्च २०२१ रोजी होणा-या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टटेनिस स्पर्धेसाठी आता ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. एकेरी प्रमाणेच सांघिक गटातही ती महाराष्ट्राकडून पदकासाठी खेळणार आहे. तसेच अहमदाबाद येथे २१ ते २५ मार्च दरम्यान होणा-या सबज्युनिअर स्पर्धेत ती महाराष्ट्र संघाकडून खेळणार आहे.
गतवर्षी मध्य प्रदेश, दिल्ली पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत प्रथमच खेळताना पदार्पणातच आयुषाने सुवर्णपदकापर्यंत मजल मारली होती.
भूगाव येथील प्रगतीशील शेतकरी व व्यावसायिक प्रमोद इंगवले यांची आयुषा कन्या असून ती श्री श्री रविशंकर विद्यामंदिर शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे. तिला प्रशांत रणदिवे व ज्ञानेश्वर पाडाळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.