पालखी मिरवणुकीने भुलेश्वर यात्रेची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:14 AM2021-09-07T04:14:11+5:302021-09-07T04:14:11+5:30
भुलेश्वर : संपूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान, तसेच जिल्ह्यामध्ये शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील माळशिरस ...
भुलेश्वर : संपूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान, तसेच जिल्ह्यामध्ये शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील श्रीक्षेत्र भुलेश्वर महादेवाच्या मंदिरात श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारची यात्रा मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडली. पालखी मिरवणुकीने भुलेश्वर यात्रेची सांगता करण्यात आली.
योगायोगाने अमावस्या व सोमवार असा योग जुळून आल्यामुळे मार्तंड भैरव स्वरूपामध्ये भुलेश्वर महाराजांची पूजा करण्यात आली. रात्री बारा वाजता शिवलिंगावर पुरंदरचे-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सपत्नीक रुद्राभिषेक केला. या अभिषेकाचे पौराहित्य चिन्मय गाडेकर यांनी केले. या वेळी पंचायत समिती सदस्या सोनाली यादव, सुनीता कोलते, माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके उपस्थित होते. या वेळी आमदार संजय जगताप यांनी लवकरात लवकर कोरोनापासून देशमुक्त होवो व मंदिरे पूर्ववत सुरू व्हावी, असे साकडे श्री भुलेश्वर चरणी केले.
दुपारी बारा वाजता पाण्याच्या कुंडामध्ये श्री भुलेश्वर मूर्तीस अंघोळ घालण्यात आली. महाआरती करण्यात आली. त्यानंतर ‘बाप्पा मोरया रे’ या भजनाच्या तालावर पालखी वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. दुपारी दीड वाजता महाद्वारावर धार घालण्यात आली. श्री भुलेश्वर देवाची पालखी दुपारी तीन वाजता माळशिरस गावाकडे प्रस्थान करण्यासाठी निघाली. गावामध्ये ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरामध्ये विसावा घेऊन पालखी पुन्हा देव वाड्यामध्ये विसावली. भारतीय पुरातत्त्व विभाग,जेजुरी पोलीस स्टेशन, वन विभाग, उत्तरादेवी चॅरिटेबल ट्रस्ट, वीज विभाग, माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी विशेष सहकार्य केले.
फोटो ओळ : श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे शिवलिंगावरती मल्हार मार्तंड पूजा साकारण्यात आली २) मानाच्या पालखी मिरवणुकीने भुलेश्वर यात्रेची सांगता करण्यात आली.
3) पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी शिवलिंगावरती महापूजा केली.