नदी प्रदुषणाविरोधात भूमाता संस्था करणार जागर : कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 08:11 PM2018-12-27T20:11:34+5:302018-12-27T20:30:37+5:30
कोल्हापूर येथील पंचगंगा नदीपासून ४ जानेवारीला या मोहिमेची सुरुवात होणार आहे.
पुणे : राज्यातील सर्वच प्रमुख नद्या प्रदुषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. लोकचळवळीच्या माध्यमातून या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी भूमाता संस्थेच्या वतीने प्रदुषणमुक्त नद्यांचा जागर ही मोहीम हाती घेतली आहे. कोल्हापूर येथील पंचगंगा नदीपासून ४ जानेवारीला या मोहीमेची सुरुवात होणार असून, पुढील टप्प्यात सातारा आणि पुण्यातील नदी प्रदुषणाबाबत जागर केला जाणार असल्याची माहिती भूमाता संघटनेचे संस्थापक कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. रमेश आवटी, कमल सावंत यावेळी उपस्थित होते.
पंचगंगा नदीचे संगमापासून (कुरुंदवाड) त उगमापर्यंत (प्रयाग, चिखली, कोल्हापूर) ४ ते ७ जानेवारी दरम्यान जागर यात्रा काढण्यात येणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत मोहिमेची सुरुवात होईल. मुळीक म्हणाले, पंचगंगेच्या प्रदुषणाची सुरुवात संगमापासून होते. त्यानंतर कोल्हापूर शहरातून इचलकरंजी जवळ वीर संताजी घोरपडे समाधी जवळ ही नदी कृष्णेला मिळते. तेथे पंचगंगेला गटाराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. शहरातील मैलापाणी, वस्त्रोद्योगातील रसायनमिश्रित पाणी, शेतीत वापरलेल्या रासायनिक खतांमुळे होणारे प्रदुषण यावर जागर मोहीमेत भर देण्यात येणार आहे. शिरोळ तालुक्यत दुषित पाण्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापर केल्याने कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सुमारे साडेसोळा हजार रुग्ण येथे कॅन्सरशी झुंज देत आहेत.
राज्यातील सर्वच शहरातून जाणाऱ्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदुषण झाल्याचे दिसून येते. तेच पाणी पुढे वाहत जाते. त्यावरच शेती, गुरांसाठी आणि पिण्याचे पाणी म्हणून वापर होतो. नद्यांच्या प्रदुषणांबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. लोकसहभाग वाढविण्याबरोबरच सरकारला देखील प्रदुषण नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेची उभारणी करणे, प्रदुषण नियंत्रणासाठी ड्रोनच्या माध्यमातून देखरेख करणे, औद्योगिक प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे अशा विविध पातळ््यांवर काम करण्यात येणार आहे. कृष्णा खोऱ्या पाठोपाठ भीमा खोऱ्यातील मुळा-मुठा, नीरा, इंद्रायणी या नद्यांच्या परिसरातही अशीच जागर मोहीम काढण्यात येणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.