दीड महिन्यात होणार गदिमा स्मारकाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:28 AM2020-12-11T04:28:12+5:302020-12-11T04:28:12+5:30
पुणे : सिध्दहस्त लेखणीने आणि अलौकिक प्रतिभेने ‘गीतरामायण’ अजरामर करणारे आधुनिक वाल्मिकी अर्थात ग. दि. माडगूळकर यांनी साहित्य आणि ...
पुणे : सिध्दहस्त लेखणीने आणि अलौकिक प्रतिभेने ‘गीतरामायण’ अजरामर करणारे आधुनिक वाल्मिकी अर्थात ग. दि. माडगूळकर यांनी साहित्य आणि चित्रपटसृष्टीत अमूल्य योगदान दिले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी कोथरुडमध्ये गदिमा स्मारक उभे राहणार आहे. येत्या एक-दीड महिन्यात स्मारकाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
यंदा ‘गदिमा’ यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. याचे औचित्य साधून गदिमा स्मारकाची मुहूर्तमेढ रोवणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी (दि. १०) ही माहिती दिली. गदिमा यांचे नातू सुमित्र माडगूळकर, नातसून प्राजक्ता माडगूळकर, कोथरुड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यावेळी उपस्थित होते.
महापौर मोहोळ म्हणाले, “स्मारकासाठी २०१७ मध्ये जागा ठरवण्यात आली. निविदा, मंजुरीची प्रक्रिया वर्षभर सुरू होती. फेब्रुवारीत प्रकल्पाला स्थायी समितीची मान्यता मिळाली. नऊ महिने कोरोनाचे संकट असल्यामुळे अनेक विकासकामे, प्रकल्प रखडले. आता स्मारकाच्या कामाला वेग येणार असून त्यांच्या स्मृती जतन करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. एक ते दीड महिन्यात भूमिपूजन होईल. स्मारकासाठी माडगूळकर कुटुंबियांच्या सूचना विचारात घेतल्या जात आहेत.”
चौकट
असे असेल स्मारक
साडेसहा एकर जागेत गदिमा स्मारक उभारले जात आहे. या ठिकाणचे ‘एक्झिबिशन सेंटर’ चार मजली असेल. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गदिमा स्मारकाची उभारणी होईल. या स्मारकाचे एकूण बांधकाम क्षेत्र ९३१ चौ.मी. आहे. इमारतीत प्रायोगिक रंगभूमीसाठी स्वतंत्र नाट्यगृह, गदिमा स्मारक, प्रदर्शन सेंटर, अँक्वारियम असे नियोजन करण्यात आले आहे. ‘गदिमा स्मारका’त त्यांचा जीवनप्रवास आणि साहित्याची समग्र माहिती देणारे दालन, गदिमांनी वापरलेल्या वस्तूंचे दालन, चित्रपटांचे दालन, डिजिटल दालन, ऑडिटोरियम आणि व्यवस्थापन कक्ष अशी पाच दालने असतील. संपूर्ण प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात साडेआठ कोटी रुपयांच्या आर्थिक तरतूदीला मान्यता मिळाली आहे.
---------------
चौकट
“गदिमा स्मारका’साठी ४३ वर्षे झगडत आहोत. विलंबामुळे संयम संपला होता मात्र कोणत्याही व्यक्ती, पक्षाविषयी अढी नाही. ‘गदिमा’ सर्वांचे आहेत. महापौरांनी स्मारकाचा आराखडा दाखवला. त्यांच्याच कार्यकाळात हे काम पूर्ण व्हावे. केवळ पुतळ्यापुरते स्मारक मर्यादीत न राहता ‘डिजिटल’ असावे. गदिमांच्या साहित्याचा आस्वाद येथे घेता यावा.”
- सुमित्र माडगूळकर