मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 02:40 AM2018-12-14T02:40:15+5:302018-12-14T02:40:43+5:30

हिंजवडी ते शिवाजीनगर २३.३ कि.मी. उन्नत मार्ग; चार महिन्यांनंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार

Bhumi Pujan in the hands of the Prime Minister of the Metro | मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

Next

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पीपीपी तत्त्वावरील मेट्रोचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी स्टेडियम येथे येत्या मंगळवारी (दि. १८) सायंकाळी ४.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, आमदार विजय काळे, नगरसेवक आदित्य माळवे उपस्थित होते.

बालेवाडीतील कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, संग्राम थोपटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, स्थानिक नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. गिरीश बापट म्हणाले, पीएमआरडीएने हाती घेतलेला अत्यंत महत्त्वाचा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ प्रकल्प राज्य शासनाने ‘महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन’ प्रकल्प म्हणून यापूर्वीच घोषित केला आहे. खासगी विकासकांच्या माध्यमातून हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाकरिता हिंंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गालगतच्या व्यापारी-व्यावसायिक मूल्य असलेल्या अंदाजे ३० ते ३५ हेक्टर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. हा प्रकल्प ‘बांधा, संकल्पन करा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर मान्यता मिळालेली आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाच्या २३.३ किमी लांबीचा व २३ स्थानके असलेला मेट्रो रेल चार आॅथोरिटीवाइज म्हणजेच एमआयडीसी, पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगरपालिका परिक्षेत्रातून धावणार आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च ८ हजार ३१३ कोटी रुपये, त्यापैकी जागा भूसंपादनासाठी १८११ कोटी रुपये लागणार आहेत. तसेच केंद्र सरकार २० टक्के (१६०० कोटी) आणि राज्य सरकार २० टक्के (१६०० कोटी) रुपये देणार आहे. मेट्रोच्या २३ स्टेशनसाठी मेगापोलीस सर्कल, क्वाड्रन, डोल्हेर, इन्फोसिस फेज २, विप्रो टेक्नॉलॉजी फेज २, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, निकमार्क, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेरगाव, कृषी अनुसंधान केंद्र, सकाळनगर, पुणे विद्यापीठ, आरबीआय, कृषी विद्यापीठ, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट या जमिनीचा स्टेशनसाठी व कारडेपो व त्याच्या सेवारस्त्यासाठी माण येथील जमिनीचा समावेश आहे.

झेडपीचा निधी पीएमआरडीएला देण्यास मंजुरी
राज्य सरकारकडून पुणे जिल्हा परिषदेला मुद्रांक शुल्कपोटी मिळणाऱ्या रकमेतील अर्धी रक्कम थेट ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात येते. उरलेल्या अर्धा टक्क्यातील पाव टक्का रक्कम जिल्हा परिषदेला, तर पाव टक्का रक्कम पीएमआरडीएला देण्याच्या निर्णयाला नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये मंजुरी मिळाली आहे. या पाव टक्का रकमेत पीएमआरडीए स्वत:ची भर घालून कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी हा निधी देणार आहे, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. मात्र या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या विकासकामांना आणि जिल्हा परिषद सदस्यांना निधी अपुरा पडणार आहे. त्यामुळे येणाºया काळात पीएमआरडीए आणि जिल्हा परिषदेमध्ये वाद होण्याची शक्यता जिल्हा परिषद सदस्यांनी व्यक्त केली आहे.

हिंंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या ताब्यातील जमिनीपैकी कारशेडसाठी ५० एकर जागा आणि एमआयडीसीच्या ताब्यातील ५ हेक्टर जमिनीच्या क्षेत्राचा ताबा मिळावा याबाबतचे भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी पुणे यांना सादर केले आहेत. शासनाने १८ जुलै २०१८ अन्वये घोषित केलेल्या निकडीचा प्रकल्प जाहीर झाल्याने शासन निर्णय १ जून २०१७ अन्वये प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेचे आगाऊ ताबे जिल्हाधिकारी यांच्याकडून पीएमआरडीएला देण्यात येणार आहेत. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होईल.
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

Web Title: Bhumi Pujan in the hands of the Prime Minister of the Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.