बालेवाडीत ऑलिम्पिक भवनाचे लवकरच भूमिपूजन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

By श्रीकिशन काळे | Published: October 3, 2023 05:20 PM2023-10-03T17:20:45+5:302023-10-03T17:25:01+5:30

एका क्रीडाविषयक कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री मंगळवारी पुण्यात बोलत होते...

Bhumi Pujan of Olympic Bhawan in Balewadi soon, informed by Deputy Chief Minister Ajit Pawar | बालेवाडीत ऑलिम्पिक भवनाचे लवकरच भूमिपूजन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

बालेवाडीत ऑलिम्पिक भवनाचे लवकरच भूमिपूजन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्रामुळे क्रीडा विश्वाला अनेक चांगले खेळाडू मिळाले आहेत. ही परंपरा कायम राखली पाहिजे. ऑलिम्पिकमधील यशात महाराष्ट्राचे योगदान वाढायला पाहिजे. तेव्हा २०२८ ऑलिंपिकचे ध्येय समोर ठेवून ग्रामीण भागातील सर्वोत्तम खेळाडूंचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यासाठीच बालेवाडी येथे ऑलिम्पिक भवन उभारणीसाठी सुमारे ७५ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला मूर्तस्वरूप देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिली.

एका क्रीडाविषयक कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री मंगळवारी पुण्यात बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, गजेंद्र पवार, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विजय ढेरे, युवराज निंबाळकर, अभिषेक बोके, अनिल वाल्हेकर, महेश कराळे, माधव दिवाण उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, 'कुस्ती, क्रिकेट आणि कबड्डी यासारख्या खेळामध्ये महाराष्ट्राला गौरवशाली परंपरा लाभली आहे. त्याचा लाभ देशाला व्हायला हवा. त्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी खेळासाठी आपल्या मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धा समोर ठेवून आपणाला तयारी करावयाची आहे. त्यासाठी क्रीडा विभागाने काम उत्तम करावे, कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवूण देणाऱ्या स्व. खशाबा जाधव यांचा जन्मदिन आपण राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनमध्ये अंतर पडत आहे, ते अंतर कमी व्हायला हवे. दोघांनी चांगल्या प्रकारे काम करून खेळाडूंवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले. खेळाडूंच्या आरक्षणाचे प्रश्न तसेच शासकीय सेवेत खेळाडूंच्या नियुक्तीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जातील. चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी चांगल्या प्रशिक्षकांची गरज आहे, असे सांगून क्रीडा विभागाच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही  पवार यांनी यावेळी दिली.

Web Title: Bhumi Pujan of Olympic Bhawan in Balewadi soon, informed by Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.