शासकीय कार्यक्रमाला बंदी असताना भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:10 AM2021-04-26T04:10:28+5:302021-04-26T04:10:28+5:30
दरम्यान, ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासकीय कार्यक्रमांना बंदी असताना कार्यक्रम घेण्याचा आ. अशोक पवार यांनी अट्टाहास केला ...
दरम्यान, ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासकीय कार्यक्रमांना बंदी असताना कार्यक्रम घेण्याचा आ. अशोक पवार यांनी अट्टाहास केला असल्याचा गंभीर आरोप सुनील कांचन पाटील यांनी केला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर कामांचा पूर्व हवेली तालुक्यात संचारबंदी व विकेंड लॉकडाऊनच्या काळात रविवारी (दि.२५) रोजी भूमिपूजनाचे कार्यक्रम घेतले आहेत. आमचा विकास कामांना विरोध नसून सध्या भेडसावत असलेल्या महामारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जावेत ते न करता केवळ प्रसिद्धीसाठी पूर्वीच्या आमदारांनी मंजूर करून आणलेल्या कामांचे भूमिपूजन गडबडीत उरकण्याचा प्रकार घडत आहे. तोही नियमावलीचे उल्लंघन करून याला आमचा आक्षेप आहे, असे सुनील कांचन यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सदर रस्त्यांना ९ मे २०१९ रोजी तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रयत्नातून मंजूरी मिळाली आहे. परंतु तांत्रिक बाबी व आचारसंहिता काळात या कामांचे टेंडर प्रक्रीया रखडली गेली होती. या कार्यक्रमात काही पदाधिकाऱ्यांनी, काही सदस्यांनी, नागरिकांनी मास्क न लावता, सोशल डिस्टनसिंग व संख्येचे सर्व नियम मोडले आहेत. मात्र सत्ता असल्याने या पदाधिकाऱ्यांना स्थानिक पोलिस अभय देत आहे. दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांनी नियम मोडले म्हणून जर त्यांच्यावर कारवाई होत असेल तर पोलिस आयुक्तांनी या गंभीर प्रकारावर पण कारवाई करावी अशी मागणी सुनील कांचन यांनी केली आहे.
कार्यक्रमाचा बांधकाम विभागाशी संबंध नाही
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर कामाचा फलक लावून भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला असला , तरी बांधकाम विभागाची कसल्याही प्रकारची परवानगी न घेता हा कार्यक्रम झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा कुठलाही अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री ग्रामसडक योजना शाखा अभियंता चेतन शिंदे यांनी सांगितले.
विकास कामाच्या भूमिपूजनासाठी उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व नागरिक.