इस्टेट एजंटवर बिबवेवाडीत गोळीबार
By admin | Published: August 26, 2014 04:48 AM2014-08-26T04:48:18+5:302014-08-26T04:48:18+5:30
मोटारसायकलवरून जात असलेल्या बांधकाम व्यावसायिकावर दोन हल्लेखोरांनी भर रस्त्यातच गोळ्या झाडल्या.
पुणे : मोटारसायकलवरून जात असलेल्या बांधकाम व्यावसायिकावर दोन हल्लेखोरांनी भर रस्त्यातच गोळ्या झाडल्या. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लेक टाऊन सोसायटीजवळच हा थरार घडला. या गोळीबारात हा बांधकाम व्यावसायिक किरकोळ जखमी झाला असून,हा हल्ला जमीन खरेदी विक्रीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
फिरोज चांद मुजावर (वय ३८, रा. सर्वे क्र. १३/३१, चिंतामणी हाईट्स, धनकवडी) असे जखमीचे नाव आहे. मुजावर याच्या पायाला गोळ्या लागल्या आहेत. मुजावर याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. तसेच, श्वान खरेदी-विक्रीचाही व्यवसाय आहे. मुजावर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याचा तसेच खुनाच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल आहे. तो खासगी बाउंसर म्हणून काम करत होता.
सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास मुजावर हे बिबवेवाडीतील मानसी लेक टाऊनच्या चढावरून त्यांच्या मोटारसायकलवरून जात होते. त्या वेळी पाठीमागून मोटारसायकलवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या आरोपीने पिस्तुलातून मुजावर याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. दुचाकीहून खाली पडलेल्या मुजावर याच्या गुडघ्याजवळ गोळ्या लागल्या आहेत. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुजावरची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सहायक आयुक्त जयवंत देशमुख यांनी सांगितले. पोलिसांकडून या गोळीबाराबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात येत नव्हती. तसेच सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन घेण्याचे सोईस्कररीत्या टाळले.(प्रतिनिधी)