लॉकडाऊनमध्ये पकडलेली बस सोडण्यासाठी घेतलेल्या लाचप्रकरणी बिबवेवाडी पोलीस निरीक्षक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 01:10 PM2020-07-30T13:10:06+5:302020-07-30T13:10:46+5:30
राजलक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या बसचालकाकडून ५० हजार रुपये घेणाऱ्या सुखदेव भिमदान चारण याला अटक केली होती.
पुणे : लॉकडाऊनच्या काळात पकडलेली बस सोडविण्यासाठी पोलीस निरीक्षकाच्या सांगण्यावरुन ५० हजार रुपये घेण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे निरीक्षकाला पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी निलंबित केले आहे.
मुरलीधर रामराव खोकले असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणात नरसिंह श्रवणसिंह राजपुरोहित यांनी बिबवेवाडीपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजलक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या बसचालकाकडून ५० हजार रुपये घेणाऱ्य सुखदेव भिमदान चारण याला अटक केली होती. त्याने पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या सांगण्यावरुन ही रक्कम घेतल्याचे सांगितले होते. त्यानंतर केलेल्या प्राथमिक चौकशीत खोकले यांचा सहभाग असल्याचे आढळून आल्याने त्यांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती अशी संचारबंदीमध्ये बिबवेवाडी पोलिसांनी बस पकडली होती़ त्यावेळी चारण हा राजपुरोहित यांना भेटला व खोकले यांच्या मदतीने बस सोडून देतो, असे सांगून १४ जुलै बसचालकाकडून ५० हजार रुपये घेतले होते. त्यानंतरही बस न सोडल्याने त्यांनी विचारणा केल्यावर ३ दिवसांनी पैसे परत केले. संतोष गड्डा याने आरोपीची मुरलीधर खोकले यांच्याबरोबर ओळख करुन दिल्याचे तपासात आढळून आले होते. त्यात खोकले यांना सहआरोपी केल्याने पोलीस आयुक्तांनी त्यांना निलंबित केले आहे.