पुणे पालिका सभागृहात आणल्या सायकली; सायकल शेअरिंग योजनेला राष्ट्रवादीचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 03:30 PM2017-12-14T15:30:45+5:302017-12-14T15:32:18+5:30
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या सायकल शेअरिंग योजनेला विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य योगेश ससाणे, महेंद्र पठारे, भैय्या जाधव यांनी सभागृहात सायकली आणल्या.
पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या सायकल शेअरिंग योजनेला विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य योगेश ससाणे, महेंद्र पठारे, भैय्या जाधव यांनी सभागृहात सायकली आणल्या. महापौर मुक्ता टिळक यांनी त्यांना समज देत सायकली बाहेर घेउन जाण्यास सांगितले. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनीही त्यांना तेच सांगितल्यावर त्यांनी सायकली बाहेर नेल्या.
सभा सुरू होताच काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी पाणी योजनेचे सल्लागार कंपनीवर कारवाई होणार की नाही, अशी विचारणा केली. महापौरांनी त्यांना ही खास सभा आहे, दुसरा विषय घेता येणार नाही, असे सांगितले. आबा बागूल यांनी कंपनीला कोण पाठीशी घालून महापालिकेचा पैसा वाया घालवत आहे, अशी विचारणा केली. खुलासा करा अशा घोषणा देण्यात आल्या. चेतन तुपे यांनी सल्लागार आपला नाही तर ठेकेदाराचा आहे असा आरोप केला.