पुणे कँटोन्मेंटमध्येही धावणार सायकली; स्मार्ट सिटीचा उपक्रम, योजनेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 14:19 IST2018-01-27T14:18:21+5:302018-01-27T14:19:36+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, त्यानंतर कृषी महाविद्यालय व आता द्विशताब्दीच्या उंबरठ्यावर असलेल्या खडकी कॅन्टोन्मेट बोर्डमध्येही स्मार्ट सिटी कंपनीच्या सायकली उपलब्ध झाल्या आहेत.

पुणे कँटोन्मेंटमध्येही धावणार सायकली; स्मार्ट सिटीचा उपक्रम, योजनेचे उद्घाटन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, त्यानंतर कृषी महाविद्यालय व आता द्विशताब्दीच्या उंबरठ्यावर असलेल्या खडकी कॅन्टोन्मेट बोर्डमध्येही स्मार्ट सिटी कंपनीच्या सायकली उपलब्ध झाल्या आहेत. प्रजासत्ताकदिनाचा मुहूर्त साधून खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते कॅन्टोन्मेंट मधील या पब्लिक सायकल शेअरिंग योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
सायकलींबरोबर कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात एकूण ९ ठिकाणी सायकल स्थानकेही तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे आता एखाद्या नागरिकाने एका स्थानकातून सायकल घेतली तर त्याला काम झाल्यानंतर त्याच्या नजिक असलेल्या सायकल स्थानकावर ती जमा करता येणार आहे. अवघा १ रूपया प्रतितास या दराने या सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती कॅन्टोन्मेंटवासियांना देण्यात आली. पहिल्या टप्प्यात १०० सायकली देण्यात आल्या आहेत.
खासदार शिरोळे यांनी उपक्रमाचे कौतूक केले. खडकी परिसर कायम गजबजलेला असतो. सायकल वापराने वाहतूकीची सातत्याने होणारी कोंडी कमी होण्यास मदत होईल. या सामाजिक फायद्याबरोबरच आरोग्य सुधारण्यासारखे वैयक्तिक फायदेही यात बरेच असल्याचे त्यांनी सांगितले व सायकलींचा जास्तीतजास्त वापर करण्याचे आवाहन केले. स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी खडकी कॅन्टोन्मेट बोर्डाला २०० वर्षे पुर्ण होताना अशी अनोखी योजना देत असल्याबद्धल आनंद वाटतो आहे असे सांगितले.
कार्यक्रमाला सर्दन कमांडच्या संरक्षण संपदा विभागाचे मुख्य संचालक एल. के. पेगू, बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप, पेडल या सायकल कंपनीचे व्यवस्थापक आगम गर्ग तसेच खडकी परिसरातील विविध मान्यवर नागरिक उपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या पब्लिक सायकल शेअरिंग योजनाचा हा तिसरा टप्पा आहे. यापुर्वी विद्यापीठ व कृषी महाविद्यालय येथे चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर तिथे जादा सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत. खडकीमधील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला तर इथेही जास्त सायकली देण्यात येतील असे यावेळी गर्ग यांनी सांगितले.