पुणे पोलिसांची मोठी कारवाई; कोयता गॅंगला कोयते पुरवणारा गजाआड, तब्बल 105 कोयते जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 12:24 PM2023-01-10T12:24:17+5:302023-01-10T12:24:30+5:30
पुणे शहरात कोयता गॅंगने चांगलाच धुमाकूळ घातला आहे
पुणे/किरण शिंदे : पुणे शहरात कोयता गॅंगने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. भरदिवसा चोरी, दुकाने - हॉटेल फोडणे, अशा घटनांमध्येही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची गस्त असूनही कोयता गॅंगच्या गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे. त्यातच पुणे शहराच्या पोलीस दलाच्या युनिट एकने मोठी छापेमारी केली आहे. कोयता गॅंगला कोयता पुरवणाऱ्या बोहरी आळीतील कोयता विक्रेत्यावर कारवाई केली आहे. या छापेमारीत त तब्बल 105 कोयते पोलिसांनी पकडले आहेत. हुसेन खोजमा राजगरा असे कोयता पुरवणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बोहरी आळीत पोलिसांची छापेमारी आहे. या कारवाईत हुसेन खोजमा राजगरा याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल 105 कोयते पकडण्यात आले आहेत. तब्बल 53 हजार 600 रुपयाचे कोयते गुन्हे शाखेच्या युनिट एकने केले जप्त केले आहेत. शहर पोलीस दलातील आतापर्यंतची सर्वात मोठी कोयत्या वरील कारवाई असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सहयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन टोणपेचे, पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या पथकाने हि मोठी कामगिरी केली आहे.