एफडीएची पुण्यात 'मोठी' कारवाई; भेसळीच्या संशयावरून ४७ लाखांचा खाद्यान्न साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 06:46 PM2020-10-22T18:46:23+5:302020-10-22T19:16:32+5:30
तेल, तूप, मिठाई, रवा, मैद्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात
पिंपरी : दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) खाद्यान्न तपासणी मोहीम सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातून खाद्यतेल, तूप, मिठाई, रवा, मैदा अशा विविध पदार्थांचे ९५ नमुने तपासणीसाठी घेतले असून, भेसळीच्या संशयावरून तूप, खाद्यतेल आणि इतर अन्नाचा ४७ लाख ५९ हजार रुपये किमतीचा तेरा टनाहून अधिक माल जप्त केला आहे.
दसरा आणि दिवाळी सणासाठी विविध खाद्य पदार्थांची मोठ्याप्रमाणावर खरेदी केली जाते. मागणी वाढल्याने या काळात कमी दर्जाचे अथवा भेसळयुक्त खाद्यान्न येण्याची शक्यता अधिक असते. यापूर्वी एफडीएने परराज्यातून आलेली कमी दर्जाची गुजरात बर्फीचे साठे जप्त केले आहेत. ग्राहकांना सकस आणि भेसळमुक्त खाद्य पदार्थ मिळावेत या साठी एफडीएने जिल्ह्यात खाद्यान्न तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
खाद्यतेलाचे २१, तूप ५, नमकीन, रवा आणि मैद्याचे प्रत्येकी २, मिठाई १९ आणि इतर खाद्यान्नाचे ४४ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. भेसळीच्या संशयावरून २९ लाख ४ हजार १५३ रुपयांचे ६८११.४ किलो खाद्यतेल साठा जप्त करण्यात आला आहे. तर पाच प्रकरणात २ लाख ४८ हजार रुपयांचे ४९९ किलो तूप जप्त करण्यात आले आहे. तर, इतर खाद्यपदार्थांचा २ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा ५ हजार २२७ किलो साठा जप्त करण्यात आला आहे. बुधवारी (दि. २१) मार्केटयार्ड येथून भेसळीच्या संशयावरून साडेतेरा लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे भेसळीच्या संशयावरून जप्त केलेला साठा ४२ लाख ५३ हजार रुपयांवर गेला आहे.
अन्न आणि औषध प्रधासनाचे सहायक आयुक्त दिलीप संगत म्हणाले, दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात खाद्यान्न तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. खाद्यान्नाचा दर्जा राखला जातो की नाही, खाद्यपदार्थात भेसळ तर नाही ना, हे तपासले जात आहे. पॅकबंद खाद्यान्न उत्पादक, घाऊक व्यापारी आणि किरकोळ विक्रेते अशा सर्वांची तपासणी केली जाणार असून, नाताळापर्यंत ही मोहीम सुरू राहील.
-----
भेसळीच्या संशयावरून साडेतेरा लाखांचे तेल जप्त
अन्न धान्य तपासणी मोहिमे अंतर्गत पुण्यातील मार्केटयार्ड येथील घाऊक बाजारात एफडीएने बुधवारी (दि २१) तपासणी केली. प्राज ट्रेडर्स या दुकानातून कृष्णा पाम तेल, रॉयल रिफाईंड सोयाबीन तेल, शगुणचे सरकी तेल आणि कीर्ती फ्रायकिंगचे रिफाईंड सोयाबीन तेलाचा १३ लाख ४९ हजार ४९१ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.