मोठी कारवाई! कुख्यात गँगस्टर निलेश घायवळला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 03:46 PM2021-03-03T15:46:48+5:302021-03-03T15:49:37+5:30
गुन्हे शाखा अन् भिगवण पोलिसांनी कारवाई
बारामती : पुणे जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी फास आवळण्यास सुरूवात केली आहे. या फासामध्ये कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ हा अडकला आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि भिगवण पोलिसांनी संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. २) घायवळ यास त्याच्या राहत्या घरातून अटक केली.
गँगस्टर घायवळ हा सोनेगाव (ता. जामखेड) या त्याच्या मूळगावी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून समजली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी अचानक छापा टाकत मंगळवारी सायंकाळी त्याला अटक केली. घायवळ याच्यावर डिसेंबर २०२० मध्ये भिगवण पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल होता. याशिवाय घायवळ याच्या विरुध्द मोक्का,खून, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे,खंडणी,दरोडा आदी गंभीर स्वरुपाचे १० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधिक्षकांनी पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घायवळला एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचा आदेश दिला आहे.
पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सुचनेनुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीवन माने,पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे आदींच्या पथकाने कि कारवाई केली. घायवळची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
—————————————