ATS ची मोठी कारवाई! जुनैदच्या बँक खात्यात पैसे पाठविणाऱ्याला जम्मू-काश्मीरमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 03:09 PM2022-06-15T15:09:41+5:302022-06-15T15:09:50+5:30

पुण्यातील विशेष न्यायालयाने त्याला २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Big action of ats arrested for sending money to Junaid bank account in jammu kashmir | ATS ची मोठी कारवाई! जुनैदच्या बँक खात्यात पैसे पाठविणाऱ्याला जम्मू-काश्मीरमधून अटक

ATS ची मोठी कारवाई! जुनैदच्या बँक खात्यात पैसे पाठविणाऱ्याला जम्मू-काश्मीरमधून अटक

googlenewsNext

पुणे : ‘लष्कर-ए-तैयबा’ दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून दापोडीतून अटक केलेल्या जुनैदच्या बँक खात्यात दहा हजार रुपये पाठविणाऱ्या तरुणास राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जम्मू-काश्मीरमधून अटक केली. पुण्यातील विशेष न्यायालयाने त्याला २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मोहम्मद युसूफ मोहम्मद शाबान अत्तू (वय ३१, रा. पोस्ट दलयोग, उधियानपूर, जि. डोडा, जम्मू-काश्मीर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानच्या कलम १२१ (अ), १५३ (अ), ११६, २०१ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात घातपाती कारवाया घडविण्यासाठी ‘लष्कर-ए-तैयबा’ दहशतवादी संघटनेत भरती आणि ‘टेरर फंडिंग’च्या संशयावरून ‘एटीएस’ने यापूर्वी जुनैद महंमद अता महंमद (वय २८, रा. दापोडी, मूळ रा. गोंधनपूर, जि. बुलडाणा), आफताब हुसैन अब्दुल जब्बार शाह (वय २८, रा. किश्तवाड, जम्मू-काश्मीर), इनामूल हक ऊर्फ इनामूल इम्तियाज (वय १९, रा. पाटणा, गिरडीह, झारखंड, सध्या रा. देवबंद, सहारनपूर, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे, तर आणखी दोघा आरोपींचा शोध घेतला जात आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपीने मोहम्मदमार्फत जुनैदच्या बँक खात्यात दहा हजार रुपये पाठविले आहेत. हे पैसे कशासाठी पाठविले, मुख्य आरोपी आणि मोहम्मदमध्ये काय संबंध आहेत, याचा तपास करण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडीत चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असे ‘एटीएस’तर्फे न्यायालयात सांगण्यात आले. बचाव पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर न्यायालयाने आरोपी मोहम्मदला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणात जम्मू-काश्मीरमधील किश्तवार येथून अटक केलेल्या आफताब हुसैन शाहच्या पोलीस कोठडीत विशेष न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली. या प्रकरणाचा तपास निर्णायक स्थितीत आहे, असे ‘एटीएस’ने न्यायालयात सांगितले.

Web Title: Big action of ats arrested for sending money to Junaid bank account in jammu kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.