पुण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लर, हाॅटेल्स, बारवर मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 04:49 PM2022-05-01T16:49:20+5:302022-05-01T16:49:26+5:30
१ मे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन व रमझान ईदच्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने गेल्या दोन आठवड्या पासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे
पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच बाहेरील वस्तीतील (out skirts) हाॅटेल्स, बार मध्ये पहाटेपर्यंत तरुणाईच्या सुरू असलेल्या हुक्का पार्ट्यां व त्यामुळे उद्भवणारी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागामार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. १ मे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन व रमझान ईदच्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने गेल्या दोन आठवड्या पासून ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.
करोना नंतर सुरु झालेल्या न्यू नाॅर्मल लाईफस्टाईल मध्ये पुण्यातील तरुणाईमध्ये रात्री उशिरापर्यंत हाॅटेलींग करणे. हुक्का पार्टीचे प्रमाण अधिकतेने वाढत असल्याचे निदर्शनास आले. त्यावर योग्य नियंत्रण आणण्यासाठी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सामाजिक सुरक्षा विभागास दिली आहे. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत व विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ सुरच असलेल्या हाॅटेल्स, बार यांना प्रथम वेळेत बंद करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या. तथापी त्यानंतरही आस्थापना विहीत वेळेत बंद होत नसल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे.
शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हाॅटेल्स, बारवर तसेच हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागास नुकतेच पुणे पोलीस दलात हजर झालेले दहा परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक व अंमली पदार्थ विरोधी सेलचे अधिकारी व स्टाफही देण्यात आले होते.
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत धनकवडी येथील सरस्वती कॉम्प्लेक्स मधील 'कॅफे सायक्लोन' मध्ये पहाटे ०२.२० वा. च्या सुमारास अवैध रित्या हुक्का बार चालू होते. त्याठिकाणी पंचासमक्ष छापा कारवाई करण्यात आली. घटनास्थळावर ११ हुक्कापॉट्स, चिलीम व वेगवेगळ्या फ्लेवरचे तंबाखूजन्य पदार्थ व इतर साहित्य असे एकुण रु. ४७,५००/- चा मुद्देमाल मिळून आला आहे. तो कायदेशीररीत्या जप्त करून 'कॅफे सायक्लाॅन' बार व हुक्का पार्लरचे मालक केतन किसन तापकीर( वय २६ वर्षे,) कुणाल किसन तापकीर( वय २९ वर्षे) ३) बार व्यवस्थापक नामे अभिषेक दत्तात्रय जगताप (वय २२ वर्षे) तसेच हुक्का सर्व्हिस करणारे ४ इसम यांच्या विरुद्ध सहकार नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.