विधानसभेत आघाडीला मोठा फटका; पुण्यात राष्ट्रवादीचे नेते म्हणतायेत, निवडणूक स्वतंत्र लढवू या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 13:34 IST2024-12-13T13:33:45+5:302024-12-13T13:34:19+5:30
आघाडी म्हणून लढलो तर जागा वाटपात त्यांना बरोबरीने जागा द्याव्या लागतील अशी भीती कार्यकर्त्यांमध्ये आहे

विधानसभेत आघाडीला मोठा फटका; पुण्यात राष्ट्रवादीचे नेते म्हणतायेत, निवडणूक स्वतंत्र लढवू या!
पुणे : लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणूक लागण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीचे नवे सरकारही त्यासाठी प्रयत्न करत आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षदेखील महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहे. पक्षाच्या शहराध्यक्षांनीदेखील तसे सूतोवाच केले आहे.
महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षासमोर राजकीय आव्हाने उभी राहिली आहेत. आघाडीतील काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे) या दोन पक्षांबद्दल त्यांच्यात नाराजी आहे. काँग्रेसची शहरातील राजकीय अवस्था अतिशय बिकट झाली आहे. विधानसभा निवडणुकीत तीन जागांवर विजय अपेक्षित असताना तीनही ठिकाणी त्यांचा पराभव झाला. विसर्जित महापालिकेत त्यांचे केवळ १० नगरसेवक होते. संघटना म्हणून काँग्रेस क्षीण झाली आहे. आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे) या दुसऱ्या पक्षालाही शहरात फार मोठे राजकीय अस्तित्व नाही. त्यांचे ९ नगरसेवक होते. अशा परिस्थितीत महापालिका निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून एकत्र सामोरे जाण्याची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची तयारी नाही. आघाडी म्हणून लढलो तर जागा वाटपात त्यांना बरोबरीने जागा द्याव्या लागतील ही भीती त्यामागे आहेच, शिवाय मोक्याच्या जागा ते मागतील व त्यातून सत्तेचे गणित बिघडेल, असेही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
स्थानिक पदाधिकारी आग्रही
पुणे महापालिकेत एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग ३ पंचवार्षिक वर्चस्व होते. त्यावेळी नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होते. काँग्रेसला बरोबर घेत महापालिकेची सत्ता ताब्यात ठेवण्याचा अजित पवार यांचा पॅटर्न जोरात होता. २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अनपेक्षितपणे ९८ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच (एकत्रित) सर्वांत मोठा विरोधी पक्ष ठरला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. फुटीनंतर बहुसंख्य नगरसेवक अजित पवार यांच्याबरोबर गेले आहेत. त्यांनी भाजपबरोबर मोट बांधली आहे. त्यामुळे महायुती म्हणून ते एकत्र लढतील असे चिन्ह आहे. भाजपच्या राजकीय लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा तसा आग्रह अजित पवार यांच्याकडे आहे.
उपनगरांमधून वाढल्या अपेक्षा
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आजही शहरात आहे. बरेचसे नगरसेवक अजित पवार यांच्याबरोबर गेले असले तरीही पक्षाला अजूनही उपनगरांमध्ये मोठा जनाधार आहे. याआधीच्या महापालिका सभागृहातही उपनगरांमधूनच पक्षाला जास्त नगरसेवक मिळत होते व त्यातूनच सत्ता मिळवणे शक्य होत होते. त्यामुळेच बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचे म्हणणे महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढू असेच आहे. स्वतंत्र लढल्यास काँग्रेस व शिवसेना यांनाही त्यांची पूर्ण ताकद लावता येईल. निकालानंतर गरज पडल्यास आघाडी पुन्हा अस्तित्वात आणता येईल असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना वाटते आहे. यासंबंधी त्यांच्या प्राथमिक बैठका सुरू आहेत. राज्य सरकारकडून महापालिका निवडणुकीसंबंधी काही हालचाल सुरू होण्याआधीच याचा निर्णय व्हावा, असे त्यांना वाटते आहे.
आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. एकूण राजकीय स्थिती लक्षात घेऊन यासंदर्भात पक्षात स्थानिक स्तरावर आम्ही चर्चा करू, त्यातील मते पक्षाध्यक्षांसमोर मांडण्यात येतील आणि त्यानंतरच अंतिम निर्णय होईल. राजकीय शक्तीप्रमाणे जागा वाटप व्हावे असेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे असते. त्यामागची कारणे समजावून घेण्यात येतील. - प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)