अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांसमोर मोठे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:16 AM2021-02-21T04:16:14+5:302021-02-21T04:16:14+5:30
याबाबत भांबर्डे ( ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मारुती कदम म्हणाले की, शिक्षण विभागाने या वर्गांचा अभ्यासक्रम ...
याबाबत भांबर्डे ( ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मारुती कदम म्हणाले की, शिक्षण विभागाने या वर्गांचा अभ्यासक्रम कमी वेळात पूर्ण व्हावा म्हणून २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे.
प्रत्यक्ष ९वी ते १२ वीचे वर्ग सुरू असले, तरी ऑनलाईन पद्धतीने घेतलेला अभ्यासक्रम पुन्हा नव्याने वर्गात घ्यावा लागत आहे. कमी वेळात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सम व विषम नंबरप्रमाणे किंवा दिवसाआड वर्ग बोलाविल्याने दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेताना वेळ कमी पडत असल्याने शिक्षकांची मोठी कसरत होत आहे. या कमी वेळात बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसाठी शाळांची दमछाक होताना दिसत आहे.
शिरूर तालुक्यात यावर्षी इ.१० वीला सुमारे ६ हजार ३६० व १२ वीला सुमारे ५ हजार २०२ विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत असल्याचे कदम यांनी सांगितले
--
कोट १
अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली असली, तरी सर्वसमावेशक आणि विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार केलेला दिसून येत नाही. विज्ञान विषयाचा विचार केला तर इयत्ता दहावी विज्ञान भाग एक आणि विज्ञान भाग दोन मिळून एकूण वीस प्रकरणे आहेत. नियमित अध्यापन प्रात्यक्षिके व उपक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यासाठी विज्ञान विषयाची पाच ते सहा प्रकरणे कमी होणे आवश्यक आहे. म्हणून विज्ञानाची काही प्रकरणे कमी करावीत. यामध्ये विद्यार्थ्यांचे हित आहे.
- संभाजी ठुबे (राज्य पुरस्कार प्राप्त) अध्यक्ष, शिरूर तालुका गणित विज्ञान अध्यापक संघ
--
कोट २
यावर्षी शाळा उशिरा सुरू झाल्या, परंतु जुलै महिन्यापासून आमचे नियमित ऑनलाईन तास सुरू झाले. सुरुवातीला ऑनलाईन तासिकांना जुळवून घेणे आम्हाला अवघड गेले पण नंतर सवय झाली. बीजगणित सारखा विषय समजून घेण्यासाठी आम्हाला अडचणी आल्या, परंतु आम्ही पुन्हा पुन्हा सराव करून त्यावर मात केली. भूगोल व विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम खूप जास्त आहे. या विषयांची काही प्रकरणे कमी होणे आवश्यक होते पण तसे झाले नाही त्यामुळे परीक्षेत अपेक्षित यश मिळेल की नाही याविषयी शंका वाटते व कधी कधी मनावर दडपण येते.
-कु. पायल सोमनाथ शेळके,
विद्यार्थ्यांनी, सणसवादडी
. ------------------------------------------
फोटो क्रमांक: २० रांजणगाव गणपती अभ्यासक्रम
फोटो:कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून शिकविताना शिक्षक.