मोठा निर्णय ! आता विद्यार्थ्यांना ५ वी अन् ८ वीच्या परीक्षेत पास व्हावेच लागणार, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 11:24 PM2023-06-23T23:24:41+5:302023-06-23T23:36:54+5:30
राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात येत होते
मुंबई - केंद्र सरकारच्याशिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत नापासच न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यांकनाच्या (सीसीई) या परीक्षा होत असून, विद्यार्थ्यांवर त्याचा म्हणावा तेवढा ताणही पडत नाही. मात्र, आता शालेय विद्यार्थ्यांच्या या परीक्षेपैकी इयत्ता ५ वी आणि ८ वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असणार आहे. राज्य शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात येत होते. मात्र, आता ५ वी आणि ८ वीमध्ये शिकताना परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाईल. सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना ५ वीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल. विशेष म्हणजे विद्यार्थी पाचवीची परीक्षा उत्तीर्ण नसल्यास त्याला पाचवीच्याच वर्गात प्रवेश दिला जाईल.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) पाचवी आणि आठवीसाठीच्या वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. जो विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही, त्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात येईल. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांत त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल. संबंधित विद्यार्थी पुनर्परीक्षेतही अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा ५ वी किंवा ८ वीच्याच वर्गात ठेवले जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे, आता ढकलपासची गाडी बंद होणार असून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण व्हावेच लागणार आहे.
दरम्यान, प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकले जाणार नाही, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.